घर खरेदीला पितृपक्ष आडवा, २५ टक्क्यांनी घटली खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:59 PM2024-10-14T17:59:59+5:302024-10-14T18:02:05+5:30
गेल्या महिन्यातील चित्र : आता दसऱ्यानंतर उलाढाल वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पितृपक्षात घरखरेदीसह मोठे व्यवहार नागरिक करण्याचे टाळले जाते. सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष आल्याने घर, शेती, प्लॉट मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार मंदावले होते. त्यामुळे मुद्रांक शुल्क कार्यालयातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे बघावयास मिळाले. नेहमीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी घरांची खरेदी घटल्याचे सांगितले जाते.
पितृपक्षात पूर्वजांचे आशीर्वाद घेतले जाते. या काळात घरासह अन्य मालमत्तेची खरेदी करण्याचे नागरिक टाळतात. पूर्वावार चालत आलेली परंपरा अजूनही पाळली जात आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असा पितृपक्षाचा कालावधी होता. या काळात अनेकांनी घर खरेदीचे व्यवहार करण्याचे टाळले. काहींनी सौदेपत्र करून घेतले. घर, शेती, प्लॉटच्या व्यवहारात अनेक दलाल गुंतले आहेत. त्यांच्याशिवाय हे व्यवहार पूर्ण होत नाही. आता आगामी काळात खरेदी- विक्रीच्या व्यवहाराची उलाढाल वाढणार आहे.
सप्टेंबरमध्ये दीड हजार मालमत्तांची विक्री
पितृपक्षात घर खरेदी करण्याचे टाळणारा मोठा वर्ग आहे. मात्र, काही नागरिक शुभ, अशुभमच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांनी आपल्या सोयीनुसार ठरल्याप्रमाणे व्यवहार केला आणि मोकळे झाले. जिल्ह्यात जवळपास दीड हजारांवर मालमत्तांची विक्री झाल्याचा अंदाज आहे.
गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के घट
- यवतमाळ शहरासह जिल्ह्यात महिन्याला चार हजारांपेक्षा जास्त घर, शेती, प्लॉट विक्रीचे व्यवहार मुद्रांक नोंदणी शुल्क कार्यालयातून केले जातात.
- सप्टेंबर महिन्यात पितृपक्ष आल्याने या व्यवहारात २५ ते ३० टक्के घट आली. गेल्या वर्षीही अशी स्थिती होती.
आता दिवाळीत वाढणार उलाढाल
पितृपक्ष २ ऑक्टोबरला संपला. दसरा सणही उत्साहात साजरा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यांत नागरिकांनी घर, प्लॉटची पाहणी करून ठेवली आहे. काहींनी सौंदेही पक्के केले आहे. आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून व्यवहार केले जाणार आहे. यानंतरही घर, प्लॉट खरेदीच्या व्यवहारात तेजी राहणार असल्याचे सांगितले जाते. नागरिक आता घरांची पाहणी करीत असून खरेदीचे नियोजन करण्याच्या प्रयत्नात आहे.
पितृपक्षाचे कारण
पितृपक्षात सोने, घर, चारचाकी वाहन, शेती, आदींची खरेदी करणे शुभ मानले जात नाही. अनेक नागरिक ही परंपरा अजूनही पाळतात. यामुळे या कालावधीत बाजारपेठेतील उलाढाल काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते