खड्ड्यांमुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघात वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:50 AM2021-09-17T04:50:14+5:302021-09-17T04:50:14+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील वडकीपासून तर पिंपळखुटी-पाटणबोरीपर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक चालकांचे नियंत्रण सुटून त्यांच्या वाहनांना ...
राष्ट्रीय महामार्गावरील वडकीपासून तर पिंपळखुटी-पाटणबोरीपर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक चालकांचे नियंत्रण सुटून त्यांच्या वाहनांना अपघात होत आहे. गेल्या एक महिन्यात या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे. या अपघातात अनेकजण मृत्युमुखी पडले आहे. निरपराध नागरिकांचा हकनाक बळी जात आहे. वडकीपासून तर पिंपळखुटीपर्यंतच्या मार्गावर दररोज अपघात होत आहे. गेल्या दोन दिवसआधी राष्ट्रीय महामार्गावरील साखरा गावाजवळील उड्डाणपुलाजवळ खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात एका अज्ञात वाहनाने इसमाला धडक दिल्याने त्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर देवधरी घाटात करंजी येथून दहेगावला जात असलले दुचाकीचालक दुचाकी खड्ड्यांमध्ये आदळल्याने गंभीर जखमी झाले. दुचाकी खड्ड्यांमध्ये आदळून अपघात होण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. वडकी ते पिंपळखुटीपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्याबाबत महामार्ग प्राधिकरणाकडे अनेकांनी लेखी तक्रारी दिल्या आहेत. पण नागरिकांच्या या तक्रारीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे.
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावर सतत अपघात होत आहे. संबंधित महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही साधी दखलही घेतल्या जात नाही. राष्ट्रीय महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातप्रकरणी महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.