बसस्थानकासाठी पर्यायी जागेचा तिढा सुटता सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 10:23 PM2019-06-02T22:23:58+5:302019-06-02T22:24:46+5:30
दीर्घ कालावधीनंतर यवतमाळ बसस्थानकाचं रूपडं बदलणार आहे. ही घटिका जवळ आलेली असताना जागेचे वांदे निर्माण झाले आहे. बसस्थानक बांधायचे तर प्रवासी वाहतूक करायची कोठून हा प्रश्न आहे. यासाठी ठिकठिकाणच्या जागेचे पर्याय ठेवण्यात आले आहे. मात्र यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दीर्घ कालावधीनंतर यवतमाळ बसस्थानकाचं रूपडं बदलणार आहे. ही घटिका जवळ आलेली असताना जागेचे वांदे निर्माण झाले आहे. बसस्थानक बांधायचे तर प्रवासी वाहतूक करायची कोठून हा प्रश्न आहे. यासाठी ठिकठिकाणच्या जागेचे पर्याय ठेवण्यात आले आहे. मात्र यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहे. काही ठिकाणची जागा लहान पडते, तर मोठी जागा उपलब्ध होण्यासाठी अडचणींची शर्यत पार करावी लागत आहे. जागेसाठी दोन दिवसांपूर्वी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या जागांचा पर्याय सुचविला. यातील काही पर्याय एसटी डबघाईस येईल असेच आहेत.
अभ्यंकर कन्या शाळा मार्गावरील नगरपरिषदेचा गोठा (सध्या हे ठिकाण कचºयाचे आगार झाले आहे), जिल्हा परिषद कार्यालयामागील रेल्वेचा भव्य परिसर, टीबी हॉस्पिटल परिसर या जागा मिळाव्या याकरिता एसटीने प्रस्ताव मांडले. काही फेºया या पर्यायी जागेतून, तर काही एसटीच्या विभागीय कार्यालय परिसरातून सोडण्याची तयारी आहे. मात्र सध्या टीबी हॉस्पिटल परिसराची जागा वर्क आॅर्डर झाल्याने मिळणार नाही. रेल्वेची जागा घेण्यासाठी किचकट प्रक्रिया आहे. नगरपरिषदेचा गोठा वापरण्याकरिता काम सुरू होणार असल्याचे कारण पुढे करण्यात आले. तरीही पालिकेच्या गोठा म्हणून ओळखल्या जाणाºया जागेला मंजूरी मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान झालेल्या बैठकीत एका अधिकाºयाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील जागा देता येईल, असा पर्याय सुचविला होता. या जागेला एसटीने नकार दर्शविला. ही जागा समतल करण्यासाठीच सहा महिने लागतील. शिवाय नागरिकांच्यादृष्टीनेही सोयीचे राहणार नाही, असे मत मांडण्यात आले. आता अखेरच्या क्षणी नगरपरिषदेचा गोठा आणि विभागीय कार्यशाळेच्या परिसरातून बसफेºया सोडून नवीन बसस्थानकाचा मार्ग मोकळा केला जाईल, असे सांगितले जाते.
खासगी जागांचाही होतोय विचार
एसटीच्या काही अधिकाºयांकडून खासगी जागा भाड्याने घेता येईल काय, यादृष्टीनेही चाचपणी केली जात आहे. प्रामुख्याने वडगाव रोड परिसरात जागा शोधण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. सरकारी जागा मिळविण्यासाठी संपूर्ण ताकदिनीशी प्रयत्न सोडून खासगी जागांसाठी अट्टहास का, हा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.