समाजजीवनात साहित्यिकांचे स्थान मोठे; नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 10:07 AM2018-01-22T10:07:35+5:302018-01-22T10:07:58+5:30
समाज जीवनात अनेक स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होत असतो, त्यामुळेच त्यांचे समाजात मोठे स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राम शेवाळकर परिसर, वणी (यवतमाळ) : समाज जीवनात अनेक स्थित्यंतरे होत असतात. या घटना साहित्यकार सातत्याने लेखणीतून मांडतात. त्याचा परिणाम समाज जीवनावर होत असतो, त्यामुळेच त्यांचे समाजात मोठे स्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
वणी येथील राम शेवाळकर परिसरात रविवारी अयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर संमेलनाचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त, वामन तेलंग, संयोजक माधव सरपटवार, श्रीपाद जोशी, विलास मानेकर, प्रा.डॉ.दिलीप अलोणे उपस्थित होते. शिक्षण आणि साहित्य क्षेत्र हे स्वायत्त असले पाहिजे, असे सांगत ना.नितीन गडकरी म्हणाले, जीवन जगताना विचार महत्त्वाचा असतो. लोकशिक्षण आणि लोकसंस्कार हे विचाराशी निगडित आहे. भारत हा सुसंस्कृत देश असून मूल्याधिष्ठित परिवारपद्धती आणि समाजसंस्कृती आपली ताकद आहे.
साहित्य, संस्कृती, नाटक, चित्रपट हे समाज जीवनावर संस्कार करणारे घटक आहेत. मराठी साहित्य विस्तृत आहे. विदर्भात साहित्य संस्कृतीचा विकास झाला पाहिजे, पैशाने जे सुख मिळत नाही, ते सुख एखादे चांगले पुस्तक वाचल्याने मिळते. त्यामुळे मानवी जीवनात पुस्तकांचे वा साहित्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्यिक, लेखक, कवी यांच्या लेखणीतून निघणारे शब्द राष्ट्रनिर्माणासाठी उपयोगी पडतात. साहित्यिकांनी लिहिलेच पाहिजे तसेच साहित्यिकांमध्ये मनभेद होता कामा नये, अशी अपेक्षा ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
साहित्य संमेलने ही लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंस्काराची केंद्रे असतात. त्यामुळे साहित्यिकांच्या हातून मूल्याधिष्ठित समाज घडो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी माजी खासदार विजय दर्डा, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विचार व्यक्त केले. समारोपात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, अविनाश महालक्ष्मे, साहित्यिक अजय देशपांडे, देवानंद सोनटक्के, गौरव खोंड, सुदर्शन बारापात्रे, पोलीस विभागातील शेखर वांढरे, प्रल्हाद ठग आदींचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले.
कलावंत, लेखकांचा सन्मान व्हावा - विजय दर्डा
वणी येथे आयोजित विदर्भ साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, ज्या देशात साहित्यिकांचा सन्मान होतो, तोच देश प्रगती करू शकतो. पाश्चिमात्य देशात कलावंत व लेखकांचा सन्मान होतो. मात्र भारत देशात तो पहायला मिळत नाही. स्विर्झलँडमध्ये एका विद्यापीठात रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा उभारला आहे. मात्र दिल्ली, मुंबई किंवा आपल्या देशातील शहरांमध्ये अशी स्थिती दिसत नाही. त्यामुळे या देशातही कवी, लेखक, कलावंतांचा सन्मान व्हावा, अशी मी अपेक्षा करतो. साहित्यिकांनी निर्भीडपणे आपली लेखणी चालवावी. आपल्या देशात कलाकृतींवरूनही वादंग निर्माण होतात. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची जी अलीकडे परंपरा सुरू झाली आहे, ती कुठे तरी थांबली पाहिजे, अभिव्यक्तीवर होणारे हल्ले रोखले गेले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. कवी, लेखक किंवा कलावंत असो त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, त्यासाठी अशा साहित्य संमेलनांची गरज असल्याचे मत विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केले.