योजना २७७ कोटींची, कंत्राटदाराला ११० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 10:02 PM2019-05-15T22:02:01+5:302019-05-15T22:03:12+5:30
बेंबळा धरणातून यवतमाळ शहरासाठी पाणी आणण्याचे काम मिळविलेल्या कंत्राटदाराला आतापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ११० कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे. कामाच्या संथगतीमुळे प्राधिकरणाने दरदिवशी तीन लाख रुपये दंड प्रस्तावित केलेल्या या कंत्राटदार कंपनीला अमरावतीमध्येही अशाच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
विलास गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेंबळा धरणातून यवतमाळ शहरासाठी पाणी आणण्याचे काम मिळविलेल्या कंत्राटदाराला आतापर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ११० कोटी रुपयांचे पेमेंट केले आहे. कामाच्या संथगतीमुळे प्राधिकरणाने दरदिवशी तीन लाख रुपये दंड प्रस्तावित केलेल्या या कंत्राटदार कंपनीला अमरावतीमध्येही अशाच कारणासाठी दंड ठोठावण्यात आला आहे.
बेंबळा धरणावरून पाणी आणण्याचे हे काम अमृत योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात आले. एकूण २७७ कोटी ५२ लाख रुपयांची ही योजना आहे. त्याचा पहिला टप्पा ५५ कोटी ६२ लाख तर दुसरा २२१ कोटी ९० लाखांचा आहे. २७७ कोटींच्या या योजनेच्या निधीत केंद्र शासनाचा वाटा ५० टक्के एवढा आहे. तर उर्वरित ५० टक्के निधीत राज्य शासन व यवतमाळ नगरपरिषदेचा प्रत्येकी २५ टक्के वाटा आहे. नाशिक येथील मे.पी.एल. आडके या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. अमरावती व इतर काही ठिकाणच्या कामाचा या कंत्राटदाराला अनुभव आहे. पाईपलाईन टाकणे, टाक्यांचे बांधकाम, पाईप अस्तरीकरण, फिल्टर प्लान्ट ही कामे आडके कंपनी करणार आहे तर पुण्याच्या एसबीएम कंपनीकडे यंत्रे, उपकेंद्र, विद्युतीकरण ही कामे आहेत. आडके कंपनीला आतापर्यंत ११० कोटी रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे.
बेंबळा प्रकल्पापासून गोदनी रोड येथील पाण्याच्या टाकीपर्यंत अमृत योजनेची पाईपलाईन टाकली जाणार आहे. बेंबळाहून टाकळी गावाच्या फिल्टरपर्यंत एक हजार मिमीची १८ किलोमीटरची पाईपलाईन राहणार आहे. तर टाकळी फिल्टरपासून गोदनी रोडच्या सम्पपर्यंत ७०० मिमीची सात किलोमीटर पाईपलाईन राहणार आहे. ही योजना आॅक्टोबर २०१९ मध्ये पूर्ण करायची आहे. मात्र यवतमाळकरांना वर्षभर आधीच पाणी पाजण्याचे राजकीय स्तरावरून प्रामाणिक प्रयत्न झाले. या प्रयत्नातूनच गेल्या वर्षी मे महिन्यात (२०१८) बेंबळापासून टाकळीपर्यंत १८ किलोमीटरची पाईपलाईन वेगवान पद्धतीने टाकण्यातही आली होती. मात्र दुर्दैवाने चार ठिकाणी निकृष्टततेमुळे पाईप फुटल्याने वेळेपूर्वी योजना पूर्ण करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. पाईप फुटल्यानंतर चार महिने काम बंदच राहिले. या पाईप पुरवठादार कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाईची तयारी करण्यात आली होती. मात्र कंपनीने नवीन पाईप देण्याचे मान्य केल्याने फौजदारी टळली. सद्यस्थितीत साडेसात किलोमीटर क्षेत्रात नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. आणखी सुमारे दहा किलोमीटरची पाईपलाईन बाकी आहे. जुन्या पाईपलाईनमधील एक किलोमीटरमधील पाईप चांगल्या दर्जाचे असल्याचा दावा आहे. पाईप पुरवठादार कंपनीकडून एक लॉट दोन किमीचा या पद्धतीने पाईप पुरविले जात आहे. त्याचीही गती संथ आहे. त्याचा परिणाम या योजनेच्या वेळेत पूर्णत्वावर होत आहे. नव्या पाईपलाईनचे दोन किलोमीटरपर्यंतचे टेस्टींग प्राधिकरणाने घेतले असून ते यशस्वी झाले आहे. जून अखेरपर्यंत पाईपलाईनचे काम पूर्ण होईल, असा दावा प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून केला जात आहे. टाकळीहून यवतमाळच्या गोदनी रोड टाकीपर्यंत पाईपलाईन पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी अवघ्या चार महिन्यात पाईपलाईन टाकली गेली होती, हे विशेष.
शेतातून पाईपलाईन गेल्याने यावेळी गळव्हा येथील शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसानभरपाई मागितली आहे. याच कारणावरून तेथे काम अडविले गेले होते. यवतमाळ शहरात ४९५ किलोमीटर एचडीपीई ११० एमएम (काळे पाईप) आणि ४५ किलोमीटर लोखंडी (४०० एमएम) पाईप टाकले जाणार आहेत. ४९५ पैकी ३०० किमी पाईपलाईन टाकून झाली आहे. वाढीव क्षेत्रात पूर्णत: नवीन पाईपलाईन टाकली जाणार आहे. जुन्या क्षेत्रात आवश्यक असेल तेथे पाईपलाईन टाकण्यात येईल व त्यांना नव्या लाईनवर पाणीपुरवठ्याचे कनेक्शन दिले जाणार आहे. बेंबळा धरण ते टाकळी फिल्टर प्लान्टपर्यंत एक हजार एमएमची १८.५० किलोमीटरची पाईपलाईन टाकली जात आहे. त्यासाठी कोलकात्ता येथील जय बालाजी इंडस्ट्रीज या कंपनीकडून पाईपचा पुरवठा केला जात आहे. त्याची किंमत ३० कोटी रुपयांच्या आसपास आहे. आतापर्यंत २७ कोटी २६ लाख रुपये जय बालाजीला प्राधिकरणाने दिले आहे. आणखी चार कोटी ७५ लाख रुपये दिले जाणार आहे. पाईप फुटल्यानंतर नवे पाईप देणे त्याची वाहतूक, टाकणावळ हा सर्व खर्च जय बालाजी इंडस्ट्रीज करणार आहे. टाकळी ते यवतमाळच्या गोदनी रोड टाकीपर्यंत ८०० एमएमचे आठ किलोमीटरचे पाईप टाकले जात असून ते पाईप पुरवठ्याचा कंत्राट दुसºया दोन कंपन्यांना देण्यात आला आहे.
नव्या १६ टाकींचे बांधकाम
अमृत योजनेतून एकूण १६ नवीन टाक्या बांधल्या जाणार आहे. त्यातील सात टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय जुन्या नऊ टाक्या कायम आहेत. त्यामुळे एकूण २५ टाक्यांवरून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
यवतमाळ शहराचे पुढील ३० वर्षांचे पाण्याचे नियोजन
बेंबळातून यवतमाळ शहरासाठी पाणी आणताना पुढील २०४८ पर्यंत ३० वर्षांचे नियोजन व शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन करण्यात आले आहे. ते पाहूनच ही योजना तयार केली गेली. सध्या ३० दशलक्ष लिटर पाणी दररोज शहराला लागते. २०४८ पर्यंत ही मागणी ९० दशलक्ष लिटर (दरदिवशी नऊ कोटी लिटर) पर्यंत वाढणार आहे. शहरासाठी ६० टक्के पाणी बेंबळा धरणावरून घेतले जाणार आहे तर उर्वरित ४० टक्के पाण्याची तहान निळोणा व चापडोह प्रकल्पावरून पूर्ण केली जाणार आहे.
केवळ फोडले तेवढेच रस्ते दुरुस्त करणार
पाईपलाईन टाकण्यासाठी खोदल्या जाणाºया रस्त्याची दुरुस्ती करताना प्राधिकरणाने ‘जेवढे खोदले तेवढीच दुरुस्ती’ हा निकष लावून काँक्रीटीकरण-डांबरीकरण केले जाणार आहे. प्राधिकरणाने काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. अमृत योजनेचे काम पावसाळ्यातही सुरू राहणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे यवतमाळ येथील उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच अमरावती येथील अधीक्षक अभियंता या तिघांची अमृत योजनेच्या या कामावर देखरेख आहे. त्यांच्याकडून नियमित पाहणी केली जात असून कंत्राटदाराला आवश्यक त्या सूचनाही दिल्या जात आहे.