यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 02:32 PM2020-04-09T14:32:08+5:302020-04-09T14:34:11+5:30
कोरोना प्रतिबंधासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र केवळ दोन दिवसात प्रयत्न करून प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आगळावेगळा प्रस्ताव यवतमाळातील अभियंत्यांनी प्रशासनाला सादर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना प्रतिबंधासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. मात्र केवळ दोन दिवसात प्रयत्न करून प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आगळावेगळा प्रस्ताव यवतमाळातील अभियंत्यांनी प्रशासनाला सादर केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा मतदारसंघाप्रमाणे परिसराची विभागणी करून घर तपासणीसाठी यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे.
यवतमाळातील डेल्टा इंजिनिअर्स संघटनेने हे ऑपरेशन सी-१९ तयार केले आहे. त्याचा प्रस्ताव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांना सादर केला आहे. सध्या शासनाने कोरोना रोखण्यासाठी २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. परिस्थिती बघता हा लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळातही भाजी बाजार, किराणा दुकाने, डिझेल, पेट्रोलपंप, औषधी दुकाने सरकारला सुरू ठेवावी लागत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक कोरोना संकट गांभीयार्ने न घेता बाजारपेठेत गर्दी करीत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केवळ दोन दिवसात प्रत्येक घर कोरोनामुक्त करण्याचा आराखडा डेल्टा इंजिनिअर्स संघटनेने तयार केला आहे.
या आराखड्यानुसार लोकसभा मतदारसंघनिहाय घर तपासणी केली जाईल. या कामाला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून घोषित केले जाईल. जिल्ह्यातील सर्व डॉक्टर, नर्स, पॅथॉलॉजिस्ट, नर्सिंग कॉलेजचे शिक्षक, जिल्ह्यातील पोलीस बल, अर्धसैनिक बल, होमगार्ड बल, महसूल कर्मचारी आदींची यादी करून त्यांना कामे सोपविली जातील. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे सर्व शाळा, कॉलेज, मोठे हॉल हे एक महिन्यासाठी कॉरंटाईन कक्ष बनविण्यात येईल. तेथे कोरोना प्रतिबंधक साहित्य उपलब्ध असेल. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाईल. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कडक संचारबंदी लागू केली जाईल. केवळ पहिल्या दिवसी जनतेला औषधी व आवश्यक वस्तू खरेदीची मुभा असेल. ऑपरेशन चमूव्यतिरिक्त इतर सर्वांना घरातच राहण्याची सक्ती असेल. सर्वप्रथम नगरसेवकाच्या घरापासून तपासणी सुरू होईल. घरातील लहान, मोठे, महिला, वृद्ध अशा सर्वांनी घराबाहेर येऊन आपापली तपासणी करून घ्यावी. त्यानंतर १५ दिवस कोणीही घराबाहेर पडणार नाही. उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची तरतूद असेल. तपासणीदरम्यान कोरोनाग्रस्त आढळल्यास त्या पूर्ण परिवाराला कॉरंटाईन कक्षात ठेवले जाईल. त्यांचे घर सॅनिटाईज केले जाईल. नगरसेवक कोरोनामुक्त आढळल्यास तोही ऑपरेशन चमूसोबत सहभागी होवून वॉडार्तील प्रत्येक घराच्या तपासणीत सहकार्य करेल. तपासणी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा डिजीटल फोटो, आधार कार्ड स्कॅन करून नाव, पत्ता, मोबाईल नंबर नियंत्रण कक्षाला पाठविला जाईल. यवतमाळ शहरात ३० पेक्षा कमी वॉर्ड आहे. त्यामुळे दोन दिवसात शहराची तपासणी पूर्ण होईल. तर दुसऱ्या टप्प्यात १६ तालुक्यांची तपासणी केली जाईल. आणि तिसऱ्या टप्प्यात सर्व खेड्यांची तपासणी होईल.
तपासणी चमूचीही तपासणी
तपासणी चमू परत आल्यांनतर त्यांना तीन दिवस नियंत्रण कक्षात ठेवून त्यांची आरोग्य तपासणी करून सुटी दिली जाईल. या कार्यक्रमासाठी कर्मचाºयांची संख्या कमी पडल्यास सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा घेतली जाईल. डेल्टा इंजिनिअर्स संघटनेचे के.एस. अय्यर, ए.एम. भालेकर, एस.बी. गिरी, एस.एस. दलाल, आर.पी. ठक्कर यांनी हा प्रस्ताव प्रशासनाला दिला आहे. आता यानुसार कार्यवाही होणार का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.