२१ लाख तरुणांच्या लसीकरणाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 05:00 AM2021-04-28T05:00:00+5:302021-04-28T05:00:17+5:30
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नगरपरिषद आदी फ्रन्ट लाईन वर्करला पहिल्या टप्प्यात लस दिली गेली. आता ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. तर १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या वयोगटात जवळपास २१ लाख तरुण आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग आलेला असतानाच आता १८ ते ४५ या वयोगटातील तब्बल २१ लाख तरुणांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून जिल्ह्यात २८४ लसीकरण केंद्र कार्यान्वित केले जाणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, नगरपरिषद आदी फ्रन्ट लाईन वर्करला पहिल्या टप्प्यात लस दिली गेली. आता ४५ वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. तर १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. या वयोगटात जवळपास २१ लाख तरुण आहेत.
सध्या जिल्ह्यात १३० लसीकरण केंद्र असून त्यात ११२ शासकीय व १८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. १ मेपासून त्यात वाढ केली जाणार आहे. ग्रामीण भागात २३० तर शहरी भागात वाढीव ३८ केंद्र सुरू केले जाणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे १६ मोबाईल टीमही कार्यरत केल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाचेही नियोजन केले जात आहे. लस देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तर कोविन ॲप हातळण्यासाठी शिक्षक व अन्य कर्मचारी मानधनावर नेमले जाणार आहे.
वाढीव लोकसंख्येसाठी वाढीव लसीकरण केंद्राची सोय केली जात आहे. प्रत्येक केंद्रावर रोज शंभर या प्रमाणे २८४ केंद्रावर एका दिवसात २८ हजार नागरिकांचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी जिल्ह्याला लसीचा पुरवठा उपलब्ध व्हावा याकरिता पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डाॅ. सुभाष ढोले यांनी सांगितले.
सव्वादोन लाख लोकांचे लसीकरण आटोपले
जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख २५ हजार १४४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
आरोग्य यंत्रणेतील १७ हजार ३२१ जणांना पहिला तर आठ हजार ४८८ जणांना दुसराही डोस मिळाला.
२३ हजार १७८ फ्रन्ट लाईन वर्करला पहिला तर सात हजार ८९ जणांंना दुसरा डोस मिळाला.
४५ वर्षावरील एक लाख ५६ हजार ४८१ जणांना पहिला डोस तर १२ हजार ५८७ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
पाटीपुरा केंद्र ठरले लसीकरणात अव्वल
यवतमाळ शहरातील पाटीपुरा प्राथमिक केंद्रावर सर्वाधिक १३ हजार ७५० लसीकरण आटोपले. त्यानंतर वणी ग्रामीण रुग्णालयात नऊ हजार ७००, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९ हजार १५०, उमरखेड ग्रामीण रुग्णालयात ८ हजार ६२०, पुसद उपजिल्हा रुग्णालयात सात हजार ९७० तर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात सात हजार ३५० जणांचे लसीकरण आटोपले.