वाईनबार-शॉप बंदीमुळे भूखंडांचे दर झाले दुप्पट

By admin | Published: February 28, 2017 01:19 AM2017-02-28T01:19:32+5:302017-02-28T01:19:32+5:30

महामार्गावरील वाईनबार हटविण्याचे आदेश दिल्याने लिकर लॉबीने अंतर्गत रस्त्यांवर धाव घेतली आहे.

Plans doubled due to warehouse-shop ban | वाईनबार-शॉप बंदीमुळे भूखंडांचे दर झाले दुप्पट

वाईनबार-शॉप बंदीमुळे भूखंडांचे दर झाले दुप्पट

Next

महामार्गावर ब्रेक : लिकर लॉबीची अंतर्गत रस्त्यांवर धाव
यवतमाळ : महामार्गावरील वाईनबार हटविण्याचे आदेश दिल्याने लिकर लॉबीने अंतर्गत रस्त्यांवर धाव घेतली आहे. त्यामुळे यवतमाळच नव्हे तर जिल्हाभरात आडवळणाच्या मार्गावरील भूखंडांचे भाव अचानक दुप्पट-तिपटीने वाढले आहे. महामार्गावरील वाईनबारची बंदी जणू अंतर्गत रस्त्यांवरील रियल इस्टेटच्या पथ्यावर पडली आहे.
राष्ट्रीय व राज्य मार्गावर ५०० मीटर क्षेत्रात असलेले वाईनबार, वाईनशॉप, बीअर शॉपी हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. १ एप्रिलपासून अशा दुकानांचे परवाने नूतनीकरण केले जाऊ नये, असेही राज्य उत्पादन शुल्क खात्याला बजावण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम व भूमिअभिलेख खात्याच्या संयुक्त चमूद्वारे महामार्गावरील दारू विक्री दुकानांची मोजणी केली. या चमूने आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. मंगळवारी या संबंधी बैठक होणार असून नेमकी किती दुकाने हटवावी लागणार हे स्पष्ट होणार आहे.
आजच्या घडीला जिल्ह्यात देशी, विदेशी, परमीट रुम, होलसेलर, बीअरशॉपी असे एकूण ५२५ दारू विक्रेते आहे. त्यापैकी ८६ टक्के अर्थात ४५४ दारू विक्रेत्यांची दुकाने महामार्गावर ५०० मीटर क्षेत्रात येत आहेत. संयुक्त चमूच्या तपासणीत यातील चार-दोन दुकाने कमी होण्याची शक्यता आहे. मात्र सुमारे साडेचारशे दुकानांना आपले बस्तान ५०० मीटर क्षेत्राबाहेर हलवावे लागणार एवढे निश्चित आहे. त्यांच्याकडे त्यासाठी आणखी महिनाभराचा अवधी आहे. सर्वोच्च न्यायालयाने शहरातून जाणाऱ्या मार्गांना जिल्हा मार्गाचा दर्जा द्यावा, ही लिकर लॉबीची याचिका फेटाळून लावली आहे.
तरीही आणखी काही मार्ग निघू शकतो का यावर चिंतन केले जात आहे. तर दुसरीकडे आपली महामार्गावरील दुकाने हलविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जात आहे. अनेक दारू विक्रेत्यांनी महामार्गापासून ५०० ते ७०० मीटर आतमध्ये आडवळणाच्या रस्त्यावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यांना रहिवासी क्षेत्रात परवानगी मिळण्याची शक्यता नाही. नागरिकांचा त्याला तीव्र विरोध होऊ शकतो. ही बाब ओळखूनच त्यांनी वस्ती नसलेल्या मार्गावर बस्तान बसविण्याचे ठरविले आहे. यवतमाळातील अनेकांनी अंतर्गत रस्त्यांवर धाव घेतल्याने तेथील भूखंडांचे दर अचानक वाढले आहेत. ८०० रुपये भावाच्या भूखंडाचा दर आता थेट दोन हजार रुपये प्रति चौरस फूट सांगितला जात आहे. हीच स्थिती तालुका स्तरावर व मोठ्या गावांमध्ये पहायला मिळते. रियल इस्टेट क्षेत्रात मंदीची लाट कायम असताना आडवळणावरील रोडवर मात्र रियल इस्टेटने अचानक उचल खालली आहे. मात्र या वाढीव दरात भूखंड खरेदी करण्याशिवाय लिकर लॉबीपुढे पर्यायही उरलेला नाही. त्याचा फायदा भूखंडधारक घेत असल्याचे चित्र आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

जिल्ह्यात ५२५ पैकी ४५४ दारू दुकाने हटविणार

एकीकडे ८६ टक्के दारू विक्री दुकानांचे परवाना नूतनीकरण वांद्यात सापडले आहे. तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाला दारू विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाचे उद्दीष्ट वाढवून देण्यात आले आहे. शासनाच्या या विसंगत कारभाराचे दर्शन होते आहे.
यवतमाळ-पिंपळगाव ते वाघापूर असा मार्ग जड वाहनांसाठी काढण्यात आला. त्याला बायपास संबोधले जाते. परंतु प्रत्यक्षात शहराच्या अगदी मध्यभागातून हा मार्ग काढला गेला. तो रहिवासी वस्ती व नागरिकांसाठी धोकादायक ठरतो आहे. या मार्गालाही हायवे, बायपासची ट्रिटमेंट दिली जात असल्याने या रोडवरील दारू विक्री दुकाने अडचणीत सापडली आहे. या मार्गाला बायपास म्हणावे कसे हाच मूळ प्रश्न आहे. बांधकाम खात्याच्या निकषातही हा मार्ग बायपास म्हणून बसत नाही.

Web Title: Plans doubled due to warehouse-shop ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.