कुष्ठरुग्णांना योजनांचा लाभ द्यावा
By admin | Published: August 1, 2016 12:50 AM2016-08-01T00:50:45+5:302016-08-01T00:50:45+5:30
कुष्ठरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यासोबतच या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना
सचिंद्र प्रताप सिंह : कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा घेतला आढावा
यवतमाळ : कुष्ठरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमाची योग्य अंमलबजावणी करण्यासोबतच या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना विविध सामाजिक योजनांचा लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा शल्यचिकित्सक टी.जी.धोटे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डी.डी.भगत आदी उपस्थित होते. औषधोपचारात खंड पडू नये व नियमित हा कार्यक्रम सुरु राहावा. नवीन रुग्ण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ९५२ इतके सक्रीय रुग्ण आहे. या रुग्णांच्या घरभेटी करून त्यांच्यावर नियमित उपचार करण्यासोबतच विविध सामाजिक योजनांचा लाभ त्यांना दिला जावा. या रुग्णांना संजय गांधी निराधार योजना, इंदिरा आवास योजना, अंत्योदय योजना, बिपीएल कार्डचा लाभ देण्यासोबतच रुग्ण व रुग्णाच्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नाशिक येथे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. प्रशिक्षणासाठी सुरुवातीस ५ हजार रुपये भरावे लागत असल्याने यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आजरग्रस्त व्यक्ती शेतकरी असल्यास बळीराजा चेतना अभियानातून ही रक्कम भरली जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)