सलाईनने जगविली हजारो रोपटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 10:15 PM2019-01-10T22:15:23+5:302019-01-10T22:16:07+5:30
राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडी मोहीम हाती घेण्यात आली. मात्र वृक्षारोपणानंतर रोपट्यांचे संगोपन करणे अवघड झाले. यावर उपाय म्हणून तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागाने अभिनव प्रयोग सुरू केला. त्यात चक्क रिकाम्या सलाईनच्या मदतीने चक्क अडीच हजार वृक्षे जगविण्यात वन विभागाला यश आले आहे.
अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडी मोहीम हाती घेण्यात आली. मात्र वृक्षारोपणानंतर रोपट्यांचे संगोपन करणे अवघड झाले. यावर उपाय म्हणून तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागाने अभिनव प्रयोग सुरू केला. त्यात चक्क रिकाम्या सलाईनच्या मदतीने चक्क अडीच हजार वृक्षे जगविण्यात वन विभागाला यश आले आहे.
शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवून वृक्ष लागवडीअंतर्गत तालुक्यात ब्राम्हणगाव ते साखरा रस्त्याच्या दुतर्फा गेल्या पावसाळ्यात तब्बल अडीच हजार रोपटी लावली. या रोपट्यांना जगविण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले होते. मात्र सामाजिक वनिकरण विभागाने चक्क रिकाम्या सलाईन गोळा करून या रोपट्यांना पाणी देण्याचा अभिवन उपक्रम सुरू केला. राज्यात प्रथमच असा अभिनव प्रयोग राबविला गेला. त्याचे फलितही दिसून येत आहे. ही झाडे आज ताठ मानेने उभी आहे.
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली. जमिनीतील ओलावा कमी झाला. त्यामुळे वृक्ष जगविण्याचे मोठे आव्हान होते. त्यातच तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागाने ब्राम्हणगाव ते साखरा रस्त्याच्या दुतर्फा गेल्या पावसाळ्यात नाविन्यपूर्ण योजनेतून अडीच हजार रोपटी लावली. मात्र जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे त्यांना जगविण्याचे आव्हान होते. अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी संजय खंदारे यांनी लाखो रुपयांची रोपटी जगविण्यासाठी दुष्काळावर मात करून पर्याय शोधला. त्यांनी ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिकाम्या सलाईन बॉटल गोळा केल्या. प्रत्येक झाडाला सलाईन बांधून त्याव्दारे पाणी देण्याचे काम सुरू केले.
आता प्रत्येक रोपटे चार ते पाच फूट उंच झाले आहे. काही झाडे नऊ फुटांची झाली. यवतमाळ विभागीय वनअधिकारी बी.पी. राठोड, सहायक वनसंरक्षक अनंता डिगोळे यांच्या मार्गदर्शनात उमरखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय खंदारे, वनपाल पी.एस. ठाकरे, अमोल येनकर आणि वनमजूर बंडू हुलकाने, गोविंद बिटेवार, नारायण म्हैसकर, शिवाजी ढाके आदींनी हा अभिनव प्रयोग राबवून अडीच हजार झाडे जगविली आहे.
वृक्ष संवर्धनाचा खर्चही झाला कमी
सर्व झाडांना अभिनव प्रयोगामुळे जीवदान मिळाले. अन्यथा ही ही झाडे वाळण्याचा धोका होता. हा प्रयोग राज्यात राबविल्यास प्रदूषण टळून झाडे वाचविण्यात यश लाभण्याची शक्यता आहे. यातून महाराष्ट्र हिरवागार होण्यास मदत मिळणार आहे. सोबतच संगोपनाच्या खर्चातही मोठी बचत होण्याची शक्यता आहे.
हा प्रयोग संपूर्ण राज्यात राबविल्यास रिकाम्या सलाईन बॉटलमुळे होणारे प्रदूषण टळेल. शिवाय लाखो रुपयांची झाडे जगविण्यास मदत मिळेल.
- संजय खंदारे
वनपरिक्षेत्र अधिकारी,
सामाजिक वनीकरण, उमरखेड