ज्येष्ठांच्या दातृत्वाची सुखद अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:00 AM2020-04-06T05:00:00+5:302020-04-06T05:00:15+5:30
ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी गरजूंना भोजन व्यवस्थेची कल्पना मांडली. चैतन्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत बापू पाटील, संचालिका वृषाली पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव व्यवहारे, सदस्य साधना बंडेवार, वसंत कावळे, आशीष औदार्य, संजय मुस्कुंदे, संतोष यादव, प्रशांत देशपांडे, मिलिंद राजे, माधवी राजे यांनी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : माणुसकीचा झरा आटला की काय, असा प्रश्न जेव्हा माणसांनाच पडतो तेव्हा या प्रश्नाचं उत्तरसुद्धा माणसंच देतात. कोरोनाच्या भयग्रस्त स्थितीत प्रत्येक माणूस स्वत:चा विचार करीत असतानाच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे ६० वर्षांवरील ज्येष्ठ अन्नधान्याचा, जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन जातात.
यवतमाळ शहरालगतच्या जांब गावातील नैराश्यग्रस्त, भयग्रस्त १५ गरीब कुटुंबाला एक महिना पुरेल एवढे धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत करतात. तेव्हा उपस्थितांच्या पापण्यांच्या कडा ओल्या होतात.
ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी गरजूंना भोजन व्यवस्थेची कल्पना मांडली. चैतन्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत बापू पाटील, संचालिका वृषाली पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव व्यवहारे, सदस्य साधना बंडेवार, वसंत कावळे, आशीष औदार्य, संजय मुस्कुंदे, संतोष यादव, प्रशांत देशपांडे, मिलिंद राजे, माधवी राजे यांनी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले. एका प्रतिष्ठानाने नफा न घेता रास्त दरात वस्तूंचा पुरवठा केला. यात विनोद राजनकर, विनोद खेडकर, नीलेश राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
जांब येथील सरपंच पुरुषोत्तम टिचुकले व सहकारी जनार्दन राठोड यांनी ज्यांना आवश्यकता आहे, अशा १५ कुटुंबाची निवड केली. बळवंत चिंताचार यांच्या नेतृत्त्वात संचारबंदीच्या सर्व नियमांचे पालन करत, सुरक्षित अंतर ठेवत साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी समाजातील दात्यांनी दातृत्वाची भावना जोपासावी आणि या कठीण काळात मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक मंडळाने केले आहे, असे सहसचिव जगदीश रिठे यांनी कळविले.