पाणंद रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:29 AM2021-07-18T04:29:30+5:302021-07-18T04:29:30+5:30
पुसद : पाणंद रस्त्याअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड होत आहे. पावसाळ्यात या पाणंद रस्त्याने शेती साहित्य आणि खत, बियाणे आदी ...
पुसद : पाणंद रस्त्याअभावी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड होत आहे. पावसाळ्यात या पाणंद रस्त्याने शेती साहित्य आणि खत, बियाणे आदी नेणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आमदारांनी त्तक घेतलेल्या गावांतही हीच स्थिती असल्याने शेतकरी वैतागले आहे.
आमदार इंद्रनील नाईक यांनी दत्तक घेतलेल्या तालुक्यातील माळआसोली गावातील पाणंद रस्त्यावर पूर्णतः चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्याने शेतात ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. माळआसोली हे आमदारांचे दत्तक ग्राम आहे. तेथील पाणंद रस्त्यावर ग्रामपंचायतीची सरकारी विहीर आहे. तेथे गावातील महिला व पुरुषांची पाणी भरण्यासाठी नेहमीच झुंबड उडते. याच रस्त्याने शेतकरी शेतीची कामे करण्यासाठी ये-जा करीत असतात.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरला आहे. गावकऱ्यांना चिखलातून मार्ग काढत जावे लागते. शेतकरी व गावकऱ्यांचे रस्त्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. मागील ५० वर्षांपासून सरकारी विहिरीवर व शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. या पाणंद रस्त्याकडे आमदारांसह जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी सर्व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी या महत्वपूर्ण व गंभीर समस्येकडे लक्ष देऊन या पाणंद रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.