भूखंड घोटाळ्याचा तपास दोषारोपपत्रांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:25 PM2018-11-27T23:25:49+5:302018-11-27T23:26:29+5:30
कोट्यवधी रुपयांच्या भूखंड खरेदी घोटाळ्यात दोन आरोपी अद्याप फरार असले तरी पोलिसांचा तपास दोषारोपपत्रापर्यंत पोहोचला आहे. सर्वात आधी दाखल झालेल्या यवतमाळ शहरच्या एका गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोट्यवधी रुपयांच्या भूखंड खरेदी घोटाळ्यात दोन आरोपी अद्याप फरार असले तरी पोलिसांचा तपास दोषारोपपत्रापर्यंत पोहोचला आहे. सर्वात आधी दाखल झालेल्या यवतमाळ शहरच्या एका गुन्ह्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तर अन्य गुन्ह्यातील दोषारोपपत्रांची उपविभागीय पोलीस अधिकारी व नंतर अपर पोलीस अधीक्षकांमार्फत छाननी केली जाणार आहे.
यवतमाळातील भूखंड घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यात आतापर्यंत सात गुन्हे दाखल होऊन १३ आरोपींना अटक झाली. दोन आरोपी अद्यापही पोलिसांना हुलकावण्या देत आहे. अटकेतील १३ पैकी १० आरोपी अद्यापही जामीन न मिळाल्याने कारागृहात आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये आता ९० दिवसाच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे. एका गुन्ह्यात ते दाखल झाले. तर अन्य सहा गुन्ह्यांमधील दोषारोपपत्र बनविणे अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसात ही दोषारोपपत्रे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुखाकडे छाननीसाठी पाठविले जाणार आहे. तेथून ते अपर अधीक्षकांकडे जाईल. या दोषारोपपत्रात कोणत्याही त्रुट्या राहू नये यासाठी ही छाननी केली जाणार आहे. अटकेतील आरोपींना या गुन्ह्यांमध्ये शिक्षाच व्हावी, ते निर्दोष सुटू नये या दृष्टीने कायदेशीररीत्या भक्कम चार्जशिट बनविली जात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
यवतमाळातील बेवारस भूखंड बनावट मालक व कागदपत्रांच्या आधारे परस्पर नावावर करून घेऊन नंतर हेच भूखंड बँकांना गहाण ठेऊन कर्ज उचलले गेले. या पद्धतीने भूखंड घोटाळा करताना अनेकांचे भूखंड हडपले गेले. बँकांच्या विशिष्ट साखळीतून या भूखंडांवर कोट्यवधींचे कर्ज दिले गेले. या कर्जात त्या बँका अडचणीत आल्या आहेत. कर्जाची रक्कम वसूल होण्याची चिन्हे नाहीत. तर या वादग्रस्त प्रकरणातील भूखंड मूळ मालकांनी ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत.
अनेक बँकांची भूखंडांशी संबंधित आणखी काही प्रकरणे अद्याप रेकॉर्डवर आलेली नसली तरी त्याची चर्चा मात्र उघडपणे होऊ लागली आहे. त्या प्रकरणांचासुद्धा पर्दाफाश होण्याची प्रतीक्षा आहे.
भूखंड माफियांच्या अनेक प्रकरणांचा पर्दाफाश अद्याप बाकी
भूखंड घोटाळ्यात पोलिसांची प्रगती सात गुन्ह्यांच्या पुढे होण्याची चिन्हे नाहीत. सात गुन्हे व १५ आरोपी, त्यातील दोघे पसार अशी या प्रकरणात पोलिसांची आतापर्यंतची प्रगती आहे. मात्र अद्याप पडद्यामागे असलेल्या प्रकरणांचा पर्दाफाश झाल्यानंतर नवे गुन्हे व त्यातील भूखंड माफियांच्या नव्या आरोपी चेहºयांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.