पतीनेच रचला पूजाच्या खुनाचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 05:00 AM2021-11-21T05:00:00+5:302021-11-21T05:00:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात १६ नोव्हेंबर रोजी पूजा कावळे या २८ वर्षीय महिलेचा मृतदेह ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात १६ नोव्हेंबर रोजी पूजा कावळे या २८ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलीस तपासात पूजाचा खून झाल्याचे पुढे आले होते. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, फरार एकाचा शोध सुरू आहे. दरम्यान, पत्नी पूजाच्या खुनाचा कट पती अनिल कावळे यानेच रचल्याचे निष्पन्न झाले आहे.
दारव्हा तालुक्यातील शेलोडी येथील २८ वर्षीय पूजा अनिल कावळे ही वाशिम जिल्ह्यातील वाईगौळ येथे राहत होती. १० नोव्हेंबर रोजी पुण्याला जाण्यासाठी ती घरून निघाली. मात्र त्यानंतर तिचा पत्ता लागला नाही. याप्रकरणी भोजराज पंजाबराव वानखेडे यांच्या तक्रारीवरून दिग्रस पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची नोंद घेण्यात आली होती. दरम्यान, १६ नोव्हेंबर रोजी दिग्रस तालुक्यातील सावंगा शेतशिवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटविली असता हा मृतदेह बेपत्ता असलेल्या पूजा अनिल कावळे हिचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दिग्रस पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ नुसार खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिग्रस पोलीस ठाणेस्तरावर एक पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथकांसह सायबर सेल अशी चार पथके गठित करून पूजाच्या खुनाचा तपास सुरू केला.
मागील चार दिवसांपासून या प्रकरणाचा पोलीस पथकांकडून कसून तपास केला जात होता. अखेर गोपनीय माहितीवरून या गुन्ह्याची उकल होत गेली.
पोलिसांनी उज्ज्वल पंढरी नगराळे (२२, रा. राळेगाव), गौरव रामभाऊ राऊत (२१, रा. कळंब) आणि अभिषेक बबन म्हात्रे (२४, रा. शिंदी बु., ता. अचलपूर, जि. अमरावती) या तिघांना एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले. या आरोपींची कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हा दुसरा-तिसरा कोणी नसून मृत पूजाचा पती अनिल रमेश कावळे हाच असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या तिघांवरही पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
खुनी शोधण्याचे पोलिसांपुढे होते आव्हान
- वाशिम जिल्ह्यातील वाईगौळ येथून १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पुण्यासाठी निघालेली पूजा कावळे बेपत्ता होती. दिग्रस तालुक्यातील सावंगा शिवारात १६ नोव्हेंबर रोजी तिचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार संशयास्पद होता. घटनास्थळी कोणताही ठोस असा भौतिक पुरावा नव्हता. त्यामुळे या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे उभे होते. मात्र समांतर तपास आणि प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीची तांत्रिक निकषावर तपासणी करीत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. खुनाच्या गुन्ह्यात पतीच मास्टर माईंड निघाल्याने खळबळ उडाली.
अधीक्षकांकडून पोलीस पथकाला २५ हजारांचे बक्षीस
- पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. के. ए. धरणे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. दारव्हाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिलखेलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकामधील यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, दिग्रसचे सपोनि विजय रत्नपारखी, विवेक देशमुख यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि अमोल पुरी, सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक योगेश रंधे, यशवंत माळोदे, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, कुणाल रुढे, अजय निंबोळकर आदींच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केल्याचे सांगत अवघ्या १२ तासात चार आरोपी निष्पन्न झाल्याने या पथकाला २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.