कृषी केंद्रात शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:09 PM2018-06-09T22:09:35+5:302018-06-09T22:09:35+5:30
महागाव तालुक्यात मुडाणा परिसरासह अनेक गावांमध्ये काहींनी कृषी केंद्र थाटले. हे केंद्रचालक शेतकऱ्यांना कच्च्या पावत्या देऊन त्यांची लूट करीत असल्याची ओरड सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुडाणा : महागाव तालुक्यात मुडाणा परिसरासह अनेक गावांमध्ये काहींनी कृषी केंद्र थाटले. हे केंद्रचालक शेतकऱ्यांना कच्च्या पावत्या देऊन त्यांची लूट करीत असल्याची ओरड सुरू आहे.
सध्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी, बियाणे, खत खरेदीसाठी कृषी केंद्रात गर्दी करीत आहे. त्यांना बियाणे, खत, औषधी दिली जाते. मात्र पॉस मशीनवरून शेतकऱ्यांना बील दिले जात नाही. काही दुकानदार बिल देतात. मात्र अनेक दुकानदार शेतकºयांची लूट करीत आहे. सदर बियाण्याची उगवण क्षमता कमी असल्यास शेतकरी संकटात सापडतो. बील नसल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळणेही दुरापास्त होते.
बील नसेल आणि पुढे ते बियाणे न उगवलयास शेतकरी पिचला जातो. यातून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याचीही शक्यता असते. शेतकऱ्यांना बील मिळाल्यास बियाणे कंपनीकडून त्यांना नुकसान भरपाई मिळविणे शक्य होऊ शकते. त्यामुळे बील न देणाऱ्या बियाणे, खत, औषधी विक्रेत्यांविरूद्ध कारवाई करणे गरजेचे झाले आहे. याकडे जिल्हा व तालुका स्तरावरील कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
पॉस मशीन ठरल्या शोभेच्या वस्तू
कृषी केंद्रचालकांना पॉस मशीन देण्यात आल्या. मात्र, त्याऐवजी शेतकऱ्यांना कच्ची पावती दिली जाते. संगणक पावतीही मिळत नाही. पॉस मशीनमधून निघालेली पावती मिळत नसल्याने कंपन्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्यास अडचण निर्माण होणार आहे.