पांढऱ्या सोन्यात शेतकऱ्यांची लूट
By admin | Published: January 12, 2015 11:00 PM2015-01-12T23:00:48+5:302015-01-12T23:00:48+5:30
निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता कापूस खरेदीतही नागविले जात आहे. दलालांनी कापूस खरेदीवर चांगलीच पकड घेत काहींनी त्यांचा कापूस चक्क आपल्या
वणी : निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता कापूस खरेदीतही नागविले जात आहे. दलालांनी कापूस खरेदीवर चांगलीच पकड घेत काहींनी त्यांचा कापूस चक्क आपल्या नावे टाकण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे. यात एकाच्याच नावे शेकडो क्विंटल कापूस चक्क सीसीआयला विकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
यावर्षी नापिकीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस आणि सोयाबिनच्या उताऱ्यात प्रचंड घट आली आहे. एकरी उत्पादन चांगलेच घटले आहे. त्यामुळे बळीराजा त्रस्त आहे. कापसाचे उत्पादन घटल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाचा गाडा हाकणे आणि पुढील वर्षीचा प्र्रपंच सांभाळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यात आता कापूस विक्रीतही त्यांची नाडवणूक होत आहे. कापूस खरेदीत दलालांनी हैदोस घातल्याने शेतकरी नागविले जात आहेत. आता कपाशी उलंगण्याच्या मार्गावर आहे. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला होता. काहींनी घरखर्च व इतर देणी देण्यासाठी कापूस विकला होता. तथापि बहुतांश कापूस साठवून होता. बँकेचे कर्ज आणि इतर देणी फेडण्यासाठी आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस काढला आहे. शेतकरी बैलबंडी अथवा इतर वाहनाने कापूस भरून वणीकडे येतात. या बैलबंडी आणि वाहनांना काही दलाल रस्त्यातच गाठतात. त्यांना अमुक व्यापाऱ्याकडे कापूस विक्रीसाठी नेण्याचा आग्रह धरतात. संबंधित व्यापाऱ्यांशी त्यांचे ‘साटेलोटे’ असते. शेतकरी संबंधीत व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर कापसाचा दर ठरतो. वणीत सध्या तीन हजार ९00 रूपयांच्यावरच प्रती क्विंटलचे दर आहे. मात्र चुकारा नगदी हवा असल्यास जादा दर देण्याचे आमिष शेतकऱ्यांना दाखविले जाते. याच आमिषाला शेतकरी फसतात. जादा दराच्या आमिषाने ते कापूस विकतात. मात्र संबंधित काही दलाल लगेच त्या शेतकऱ्याच्या कापसाचा परस्पर चुकारा उचलून तो आपल्याजवळ ठेवतात. आठ ते १५ दिवस हा चुकारा वापरून नंतर पैसे शेतकऱ्याला देण्यात येते. त्यातून दलाली कापण्यास मात्र ते विसरत नाहीत. वणीत सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआय थेट शेतकऱ्यांकडून कापूस घेते. कापसाचा धनादेश शेतकऱ्याच्या हाती देण्यात येतो. मात्र दलाल मधातच शेतकऱ्यांना गाठून त्यांना नगदी चुकारा, जादा दर आदींच्या आमिषात भूलवून ठेवतात. त्यात बळीराजा फसतो. काही दलाल तर चक्क आपल्याच नावे सीसीआयकडून धनादेश घेत असल्याचीही चर्चा आहे. सीसीआयला व्यापाऱ्यांनीच जादा कापूस विकला असावा, असा कयास वर्तविण्यात येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)