गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांचा अॅक्शन प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:05 PM2018-03-08T22:05:38+5:302018-03-08T22:05:38+5:30
गुन्हेगारीपूरक अवैध धंदे बंद करण्यावर पोलीस भर देत असून ज्या व्यवसायातून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते, ते अवैध धंदेवाले पोलिसांच्या हिट लिस्टवर असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सुरेंद्र राऊत।
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : गुन्हेगारीपूरक अवैध धंदे बंद करण्यावर पोलीस भर देत असून ज्या व्यवसायातून गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते, ते अवैध धंदेवाले पोलिसांच्या हिट लिस्टवर असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गुन्हेगारीचा पूर्णत: बिमोड करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या यवतमाळ शहरात कुठलीच दहशत नसून गेल्या दोन महिन्यात शहरात पाच खून झाले. त्यातील तीन खून गुन्हेगारांचे, तर दोन अनैतिक संबंधातील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व घटनांतील आरोपींना १२ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे पोलिसांचे गुन्हेगारी व गुन्हेगारांवर पूर्ण नियंत्रण असून गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सण-उत्सवाच्या बंदोबस्तासोबत हा प्लॅन राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारी या कालावधीत अवैध दारू गुत्त्यांवर ८१९ धाडी टाकून तब्बल एक कोटी तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अंमली पदार्थ प्रतिबंधक कारवाईमध्ये चार प्रकरणात पाच लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दारूबंदी कायदा ६५ ई (फ) मध्ये अवैध दारू व्यावसायिकाला न्यायालयात शिक्षा होईल, अशा स्वरूपाच्या ‘मॉडेल केस’ करण्याचे निर्देश एम. राज कुमार यांनी ठाणेदारांना दिले. अवैध दारू, अंमली पदार्थ या भोवतीच गुन्हेगारांचे वर्तुळ आहे. हे वर्तुळ भेदण्यासाठी मुळावरच घाव घातला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात गांजाचा नशा करणाºयांवरही कारवाई केली जात आहे. शिवाय शहरातील गुन्हेगारीला पोसणाºया गोवंश तस्करीवरही चाप बसविला गेला. पांढरकवडा उपविभागातील तेलंगणा सीमेलगतचे रस्ते सील केले आहेत. यामुळे आता यवतमाळमार्गे गोवंश तस्करी होत असल्याचे काही प्रकरणावरून दिसून आले. त्यामुळे येथेही धडक कारवाई सुरू असल्याने हा मार्ग बंद झाल्याचा दावा त्यांनी केला.
दोन गुडांना केले तडीपार
कुख्यात गुंड अमित यादव याला दोन वर्ष, तर विलास पारधी याला एक वर्षासाठी तडीपार केले गेले. शहरासह जिल्ह्यातील ७५ गुन्हेगारांची यादी तयार असून लवकरच त्यांच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी ठाणेदारांना दिले. काही ठिकाणी चेनस्नॅचिंगसारख्या घटना घडल्या. यातीलही बहुतांश गुन्हे उघडकीस आले. पोलीस असल्याची बतावणी करून ठगणारी ‘इराणी गँग’ आमच्या रडारवर असल्याचे त्यांनी सांगितले. यात श्रीरामपूर-पुसदचा आरोपी दिल्ली पोलिसांनी अटक केला आहे. त्याला यवतमाळ पोलीस ताब्यात घेणार आहे.
अवैध सावकारांवरही करडी नजर
अवैध सावकारीच्या नियंत्रणासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी पोलीस समन्वय ठेवून आहेत. पक्की तक्रार मिळाल्यानंतर अशा सावकारांचाही पोलीस कायदेशीर बंदोबस्त करण्यास सज्ज आहे. जिल्ह्यातील अशा अवैध सावकारांची यादी तयार केली जात आहे. नजीकच्या काळात याबाबत ठोस कारवाई झाल्याचे दिसून येईल, अशी ग्वाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.