बगीरा गँगमधील १२ जणांविरुद्ध मोक्का; पोलिस प्रशासन आक्रमक झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:17 PM2023-02-04T14:17:45+5:302023-02-04T14:18:18+5:30

महिनाभरात जिल्ह्यात मोक्काअंतर्गत दोन गुन्हे

police administration strict action, Mokka against 12 of the Bagheera gang | बगीरा गँगमधील १२ जणांविरुद्ध मोक्का; पोलिस प्रशासन आक्रमक झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

बगीरा गँगमधील १२ जणांविरुद्ध मोक्का; पोलिस प्रशासन आक्रमक झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Next

यवतमाळ : दारव्हा रोडवरील रशिद ढाब्याजवळ कुख्यात बगीरा गँगच्या सदस्यांनी एकास मारहाण करून जखमी केले होते. एवढ्यावर न थांबता या युवकांनी शासकीय रुग्णालयात घातक शस्त्रासह जाऊन उपचार सुरू असलेल्या तरुणावर चाकू व इतर शस्त्राने हल्ला करून जखमी केले होते. या प्रकरणात आता सर्व १२ आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत वाढीव गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या आक्रमक कारवाईमुळे वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे महिनाभरातील मोक्काअंतर्गतची जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई आहे.

दारव्हा रोडवरील एका ढाब्यावर रात्रीच्या वेळी जेवण करताना क्षुल्लक कारणावरून वाद घालत बगीरा गँगच्या सदस्यांनी एका युवकास जबर मारहाण केली होती. ही बातमी कुख्यात गुंड आशिष ऊर्फ बगीरा रमेश दांडेकर (रा. चांदोरेनगर) याला मिळताच त्याने गँगमधील मुलांशी झालेल्या वादाची खुन्नस मनात धरून भांडणात जखमी झालेल्या व जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाला मारहाण केली. यावेळी चाकूसह इतर शस्त्रांचा वापर करण्यात आला. रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी बचावाकरिता धाव घेतली असता त्यांनाही अरेरावी करण्यात आली.

याप्रकरणी ७ डिसेंबर रोजी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तपासात एकूण १२ आरोपी आढळल्याने हा संघटित गुन्हेगारीतून केलेला गुन्हा असल्याने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पोलिस महानिरीक्षक अमरावती यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला ३ फेब्रुवारी रोजी त्यांनी मंजुरी दिल्याने बगीरा गँगमधील १२ जणांविरोधात आता मोक्काअंतर्गत कारवाई होणार आहे.

कारवाईत या १२ आरोपींचा समावेश

मोक्काअंतर्गत कारवाई होणाऱ्यांमध्ये आशिष ऊर्फ बगीरा रमेश दांडेकर (चांदोरेनगर), धीरज ऊर्फ ब्रँड सुनील मैंद (रा. वंजारी फैल), विशाल प्रफुल्ल वानखडे (रा. बांगरनगर वाघापूर नाका), स्तवन सतीश शहा (रा. विश्वशांतीनगर पिपळगाव रोड), लोकेश चंद्रकांत बोरखडे (रा. विसावा कॉलनी, पिंपळगाव रोड), वंश सुनील राऊत (रा. बांगरनगर), दिनेश मधुकर तुरकाने (रा. पुष्पकनगर बाभूळगाव), प्रज्वल किशोर मेश्राम (रा. आकृती पार्क यवतमाळ), ऋषिकेश ऊर्फ रघू दिवाकर रोकडे (रा. अभिनव कॉलनी, गिरीनगर यवतमाळ), मनीष हरिप्रसाद बघेल (रा. वैभवनगर), लखन अवतडे (रा. जामवाडी) आणि आकाश विरखेडे (रा. एकतानगर वाघापूर) या आरोपींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सामाजिक शांततेत बाधा पोहोचविणाऱ्या गुन्हेगारांना वेळीच प्रतिबंध होऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई गरजेची असल्याने मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. संपत्तीविषयक गुन्हे करणारे तसेच अवैध रेती तस्कर, गावठी दारूविक्री आणि संघटित गुन्हेगारीतून दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही मोक्का तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. कोणत्याही गुन्हेगारी गय केली जाणार नाही.

- डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक, यवतमाळ

Web Title: police administration strict action, Mokka against 12 of the Bagheera gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.