भूसंपादनावरून पोलीस व महसूल पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 09:41 PM2019-04-24T21:41:00+5:302019-04-24T21:42:41+5:30
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल्ला केला. यात ठाणेदारासह दोन महिला पोलीस जखमी झाल्या. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली.
भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अर्जुना येथील रवींद्र गोकुलप्रसाद जयस्वाल यांनी त्यांचे राहते घर रिकामे केले नाही. या जागेचा ताबा घेण्यासाठी नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक अर्जुना येथे पोहोचले. यावेळी रवींद्र गोकुलप्रसाद जयस्वाल, नीता रवींद्र जयस्वाल व रोशन रवींद्र जयस्वाल यांची महसूल कर्मचाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घराचा मोबदला योग्य मिळाला नसल्याचा आक्षेप जयस्वाल कुटुंबियांनी घेतला. पथकातील कर्मचारी समजूत काढत असतानाच नीता जयस्वाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महिला पोलीस शिपाई शीला खडसे व आशा नाईक या दोघींवर हल्ला केला. तसेच इतर कर्मचाºयांवर दगडफेक सुरू केली.
यातील विटेचा तुकडा पोलीस निरीक्षक दीपक पवार यांना लागला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत तिघांनाही ताब्यात घेतले. वाहनात डांबून त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांनी जयस्वाल कुटुंबीयांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून हल्ला केल्याची तक्रार दिली. तसेच जखमी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनही तिघांविरुद्ध तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात कोणतीही नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात घेण्यात आली नव्हती. मात्र आरोपींच्या अटकेसाठी न्यायालयाकडे रीतसर परवानगीचा अर्ज ग्रामीण पोलिसांनी केला होता.
काही काळ तणाव
भूसंपादनासाठी अर्जुना येथे केवळ एकाच घराचा अडथळा आहे. तो समजुतीने दूर करण्यासाठी गेलेल्या पथकांसोबत वाद झाला यामुळे घटनेला वेगळे वळण मिळाले.