पुसदमध्ये पोलीस वर्धापन दिन सप्ताह
By admin | Published: January 5, 2016 02:54 AM2016-01-05T02:54:27+5:302016-01-05T02:54:27+5:30
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असलेल्या पोलीस दलाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. पोलीससुद्धा माणूसच असून
पुसद : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद असलेल्या पोलीस दलाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. पोलीससुद्धा माणूसच असून पोलीस खात्याबाबतची खरी माहिती शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविणे व जनतेशी सुसंवाद साधत शस्त्रास्त्र प्रदर्शन करून लोकांच्या मनातील भीती दूर करण्याच्या उद्देशाने पुसद शहर पोलीस स्टेशन, वसंतनगर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा पुसद यांच्यामार्फत २ ते ८ जानेवारीपर्यंत पोलीस वर्धापन दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहांतर्गत येथील छत्रपती शिवाजी चौकात जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस बॅन्ड पथकाने केलेल्या प्रदर्शनाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. येथील शहर पोलीस स्टेशन व वसंतनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सप्ताहाच्या प्रारंभी शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात ‘पोलीस मित्र’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ठाणेदार अनिल कुरळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, मधुकर चव्हाण आदींची उपस्थिती होती.
यावेळी वाहतुकीचे नियम, पोलिसांची कामे, पोलीस खात्याबाबतची माहिती, पोलिसांसोबतचे गैरसमज आदी विविध विषयांवर माहिती देण्यात आली व जनतेशी सुसंवाद साधण्यात आला. या सप्ताहात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांतर्फे माहिती देण्यात येणार असून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती शहरचे पालीस निरीक्षक अनिल कुरळकर यांनी दिली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय डहाके, पोलीस उपनिरीक्षक बंडू जाधव, जमादार अशोक तडसेसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)