जिल्हाभरातील पोलीस दररोज तीन तास रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 09:37 PM2018-08-30T21:37:38+5:302018-08-30T21:38:38+5:30
आगामी गणेशोत्सवातील तयारीचा भाग म्हणून जिल्हाभरातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी शुक्रवारपासून दररोज सायंकाळी ६ ते ८ असे तीन तास रस्त्यावर राहणार आहेत. या तीन तासात वाहनांची तपासणी, गुन्हेगारांची तपासणी, समन्स-वॉरंट अंमलबजावणी यावर भर दिला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आगामी गणेशोत्सवातील तयारीचा भाग म्हणून जिल्हाभरातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी शुक्रवारपासून दररोज सायंकाळी ६ ते ८ असे तीन तास रस्त्यावर राहणार आहेत. या तीन तासात वाहनांची तपासणी, गुन्हेगारांची तपासणी, समन्स-वॉरंट अंमलबजावणी यावर भर दिला जाणार आहे.
१३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होतो आहे. या निमित्ताने राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी नुकतीच राज्यातील सर्व घटक प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत महासंचालकांनी दिलेल्या दिशानिर्देशांची माहिती देण्यासाठी व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी गुरुवारी येथे जिल्हाभरातील सर्व ठाणेदार, एसडीपीओंची बैठक घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंग जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. गणेशोत्सवातील शांततेसाठी अनेक उपाययोजना या बैठकीत सूचविण्यात आल्या. त्यानुसार आता दररोज सायंकाळी तीन तास सर्व पोलीस आपल्या ठाण्यांच्या हद्दीत गस्तीवर राहणार आहे. या काळात गुन्हेगारीला प्रतिबंध घालणे, लोकांना भेटणे, समस्या जाणून घेणे, संशयितांची धरपकड, शस्त्र तपासणी, रॅली, जनजागृती आदींवर भर राहणार आहे.
एसडीपीओ व ठाणेदार गावात
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांची अ आणि ब गटात वर्गवारी केली जाणार आहे. या प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेट देण्याचे आदेश एसडीपीओ व ठाणेदारांना देण्यात आले आहे. प्रत्येक गावात व्हीलेज रजिस्टर लिहून त्याची माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्याचे बंधन त्यांना घालण्यात आले. विविध सामाजिक संस्था, शांतता समिती यांच्या बैठका घेतल्या जाणार आहे. अनेक ठाणेदारांनी गुरुवारपासूनच महानिरीक्षकांच्या सायंकाळच्या तीन तासाच्या गस्तीची अंमलबजावणी सुरू केली.
तडीपारीचे प्रस्ताव निकाली काढा - तरवडे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए, तडीपारीचे प्रस्ताव वेगाने मार्गी लावून निकाली काढण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी ठाणेदारांना दिल्या. गणेशोत्सवातील शांततेसाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. समन्स-वॉरंटची प्रामाणिकपणे व तत्परतेने तामिली होत नसल्याने पोलिसांवर न्यायालयाची नेहमीच नाराजी राहते. ती टाळण्यासाठी समन्स-वॉरंटची तत्काळ अंमलबजावणी करण्यास ठाणेदारांना सांगण्यात आले. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा काटेकोर तपास करून आरोपीला न्यायालयात शिक्षा होईल यावर भर द्यावा, या माध्यमातून न्यायालयीन खटल्यांमध्ये शिक्षेचा दर वाढवावा, असे निर्देश महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत.