महिलेचे अपहरण करणाऱ्याला अटक; पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 06:55 PM2023-04-04T18:55:58+5:302023-04-04T18:56:25+5:30
महिलेचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली.
अविनाश खंदारे
उमरखेड (यवतमाळ) : मराठवाड्यातील अनेक गावांत जबरी चोरी, रॉबरी व अपहरणाच्या अनेक गुन्ह्यांत सामील अट्टल गुन्हेगाराला नांदेड व हदगाव येथील पोलिस सिनेस्टाईल पाठलाग करत असताना उमरखेडजवळ नाकाबंदी करून त्यास जेरबंद करण्यात आले. ही घटना उमरखेड-पुसद रोडवरील कॅनाॅलजवळ घडली.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील या अट्टल गुन्हेगाराने मुखेडवरून महिलेचे अपहरण केले. तसेच जबरी चोरी व रॉबरीसारखे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याचे लोकेशन पोहरादेवी येथे दाखवल्यानंतर नांदेड एलसीबी तथा हदगाव पोलिस पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने तेथून चारचाकी वाहनाने पळ काढला. पोलिस त्याचा पाठलाग करत असताना त्याने रस्त्यात येणाऱ्या अनेक गाड्या क्षतीग्रस्त केल्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
त्याने नांदेडच्या एलसीबी वाहनाचेसुद्धा नुकसान केले. त्याचा पाठलाग करत असताना उमरखेड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावरून उमरखेड पोलिसांनी पुसद रोडवरील दहागाव कॅनलजवळ नाकाबंदी केल्यामुळे आरोपीला तेथून वाहन नेता आले नाही. त्याचवेळी मागून येणाऱ्या नांदेड एलसीबी पथक व हादगाव पोलिस तसेच उमरखेड पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आरोपीला एलसीबीच्या स्वाधीन केले.