पोलीस बिझी, लुटारू रस्त्यावर

By admin | Published: February 14, 2017 01:34 AM2017-02-14T01:34:56+5:302017-02-14T01:34:56+5:30

पोलीस यंत्रणा निवडणूक कामात बिझी झाल्याचे पाहून लुटारू रस्त्यावर उतरले आहेत.

Police Bizi, On the Robber Street | पोलीस बिझी, लुटारू रस्त्यावर

पोलीस बिझी, लुटारू रस्त्यावर

Next

२४ तासात तीन मंगळसूत्र हिसकले
यवतमाळ : पोलीस यंत्रणा निवडणूक कामात बिझी झाल्याचे पाहून लुटारू रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या २४ तासात मंगळसूत्र हिसकावल्याच्या तीन घटना उघड झाल्या आहेत. अशाच आणखी काही घटना घडल्या असण्याची परंतु पोलिसांपर्यंत तक्रारी न आल्याने त्या अद्याप गुलदस्त्यात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मंगळसूत्र चोरीच्या पाठोपाठ घडलेल्या या घटनांनी महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांची ही मालिका पाहता ‘महिलांनो, सावधान’ असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता आर्णी रोडवरील राणाप्रताप गेटच्या आत मंगळसूत्र चोरीची घटना घडली. काळे ले-आऊटमधील गजानन महाराज मंदिरामध्ये भागवत सप्ताह सुरू आहे. तेथून एक महिला पायदळ परत जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंळसूत्राला झटका देऊन पळ काढला. या घटनेची राणाप्रताप गेट परिसरात चर्चा सुरू असताना अशीच दुसरी घटना गोधनी रोडवरील विदर्भ हाऊसिंग सोसायटी स्थित साई मंदिर परिसरात घडली. माळीपुरा येथील एक महिला टेलरिंगचा व्यवसाय करते. ती घरी येण्यासाठी निघाली असता सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी तिचे मंगळसूत्र हिसकले. या महिलेने लगेच पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. तत्पूर्वी रविवारी रात्री ८ वाजता मंगळसूत्र चोरीची एक घटना दारव्हा रोडवरील कोल्हे ले-आऊट नजीकच्या नवप्रभा कॉलनीमध्ये घडली. प्रेमिला विलास घुले या रात्री ८ वाजता घराच्या परिसरात शतपावली करीत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये खळबळ असली तरी शहराचे वरिष्ठ अधिकारी कार्यालय मात्र या तीनही घटनांबाबत अनभिज्ञ असल्याचे ‘लोकमत’ने संपर्क केला असता निदर्शनास आले.
तीनही घटनांमधील गुन्ह्यांची पद्धत एक सारखीच आहे. गुन्ह्याचा वेळ हा सुद्धा सायंकाळी ७ ते ८ असाच आहे. ते पाहता या तीनही घटनांमागे एकच टोळी असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

लुटारू जुने की नवे ?
काही वर्षांपूर्वी यवतमाळात मंगळसूत्र चोरांच्या टोळीने उच्छाद मांडला होता. त्यांच्या कारवायांनी पोलीस अधीक्षक व महानिरीक्षकांचीही झोप उडविली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. या चोरीतील माल एका मटका व्यावसायिकाने पचविला होता. त्याला सुवर्ण व्यावसायिक व पोलीस दलातीलच काही भागीदारांची साथ असल्याचे उघड झाल्याने पुढे पोलिसांच्या तपासाची गती आपसुकच मंदावली होती. तीच टोळी आता पुन्हा सक्रिय झाली नाही ना असा संशय आहे.

Web Title: Police Bizi, On the Robber Street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.