उपजिल्हा रुग्णालय लसीकरण केंद्रावर पोलिसांची दादागिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:44 AM2021-05-06T04:44:26+5:302021-05-06T04:44:26+5:30
लसीकरण केंद्रावरील रांगेच्या वादातून वाद होत असल्याने रुग्णालयाच्या सुरक्षा विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाची सोय ...
लसीकरण केंद्रावरील रांगेच्या वादातून वाद होत असल्याने रुग्णालयाच्या सुरक्षा विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहरात उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून शहरातील काही राजकीय पदाधिकारी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न लसीकरण सुरू झाल्यापासून करीत आहेत. त्यामुळे या लसीकरण केंद्रांवर उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य विभागातील काही कर्मचारी व ड्युटीवर असलेल्या पोलिसांचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे.
सध्या जे नागरिक प्रामाणिकपणे टोकन घेत आहेत, तसेच ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करीत आहेत, त्यांना लसीकरण केंद्रावर दुजाभावाचा अनुभव येत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातून लसीकरण केंद्रावर पोलीस कर्मचारी आणि सामान्य नागरिकांमध्ये वादाचे प्रकार उद्भवत आहेत.
येथे लसीकरणाची सोय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली आहे. या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिक लस घेण्यासाठी सकाळी ८ पासून प्रामाणिकपणे रांगेत उभे राहतात. मात्र, नियमानुसार या नागरिकांचा नंबर असतानाही, रुग्णालयातील कर्मचारी व पोलीस आपापल्या परिचयातील नागरिकांना थेट लसीकरणासाठी आत प्रवेश देत होते. यावेळी पोलिसांची व कर्मचाऱ्यांची मनमानी पाहून एकाने पोलिसाला हटकले. मात्र, पोलीस निव्वळ वाद घालत होते. लसीकरण केंद्रावरील या अरेरावीच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. संबंधित आरोग्य अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांचे यावर नियंत्रण असावे, अशी मागणी लसीकरण केंद्रावरील नागरिक करीत आहेत.
बॉक्सा्र
लसीकरणासाठी उसळली गर्दी
लसीकरण केंद्रावरील गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणांवर आहे. दुसरीकडे काही पोलीस कर्मचारी आणि स्वयंघोषित कार्यकर्ते आपल्या ओळखीच्या व्यक्तींना आधी सोडण्यासाठी नागरिकांशी हुज्जत घालत असल्याचा धक्कादायक प्रकार होत आहे. या परिसरात हे एकमेव केंद्र असल्यामुळे या केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.