काँग्रेसचे आंदोलन पोलिसांनी उधळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:15 PM2018-12-27T20:15:58+5:302018-12-27T20:16:17+5:30
वणी व झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्यावतीने आयोजित मुंडण आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. दुष्काळग्रस्त जनतेला न्याय मिळावा म्हणून लोकशाही मार्गाने अतिशय शांतपणे सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी उधळून लावल्यामुळे काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी व झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसाठी गुरूवारी काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्यावतीने आयोजित मुंडण आंदोलन पोलिसांनी उधळून लावले. दुष्काळग्रस्त जनतेला न्याय मिळावा म्हणून लोकशाही मार्गाने अतिशय शांतपणे सुरू असलेले आंदोलन पोलिसांनी उधळून लावल्यामुळे काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांचा निषेध केला.
वणी व झरी तालुक्यात पावसाअभावी दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीसाठी यापूर्वी काँग्रेस सेवादलाच्यावतीने टाकळी ते टाकळी पदयात्रा काढण्यात आली होती. त्यानंतर अनेकदा प्रशासनाला स्मरणपत्रेही देण्यात आली. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने गुरूवारी मुंडण आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार येथील तहसील कार्यालय परिसरात दुपारी १ वाजता आंदोलनाला प्रारंभ झाला. या आंदोलनादरम्यान मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे ५१ कार्यकर्ते मुंडण करणार होते. परंतु सहा कार्यकर्त्यांचे मुंडण होत नाही, तोच पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन उधळून लावले. त्यामुळे आंदोलनकर्त्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी यावेळी जवळपास २५ कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांच्या या कृतीचा काँग्रेस सेवादल व काँग्रेसच्यावतीने निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अॅड.राजीव कासावार यांनी केले. या आंदोलनात माजी आमदार वामनराव कासावार, मोरेश्वर पावडे, अनिल देरकर, राजीव येल्टीवार, रामन्ना येल्टीवार, भुमारेड्डी बाजन्लावार, मुन्ना कुरेशी, डॉ.भास्कर महाकुलकर, रमेश येरणे, प्रदीप बोनगीरवार, ओम ठाकूर, राकेश खुराणा, विवेक मांडवकर, प्रमोद वासेकर, विलास भोंगळे, गणेश पायघन, डॅनी सँड्रावार, डेवीड पेरकावार, संजय खाडे, राजू येल्टीवार, शेखर बोनगीरवार, झिंगू पिंपळशेंडे, विकेश पानघाटे, प्रमोद निकुरे, सुनील वरारकर, रवी कोटावार, धनराज देवतळे, महादेव दोडके, रसुल खान पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आमदार वजाहत मिर्झा यांनी दुष्काळ परिस्थितीचे पूर्वालोकन करण्यासाठी विनंती केली होती. ही विनंती मान्य करून फेरसर्व्हेक्षणाचे आदेशही देण्यात आले. तसेच हे दोनही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही वणी व झरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. शासनाने टाळाटाळ न करता तातडीने हे दोनही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाने केली आहे.
तर शासनाची तेरवी करू
वणी, झरी तालुक्यात दुष्काळामुळे नागरिक व शेतकºयांची अतिशय बिकट अवस्था आहे. अशा परिस्थितीत हे दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित न केल्यास आजपासून १३ दिवसानंतर शासनाची तेरवी केली जाईल, असा इशारा राजीव कासावार यांनी दिला.