पोलिसांनो, ‘सीआयडी’च्या सूचना पाळा; महासंचालकांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:56 PM2017-11-25T14:56:13+5:302017-11-25T14:56:53+5:30
कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी ‘सीआयडी’कडून (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) तपासाबाबत वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : कोठडीतील मृत्यू टाळण्यासाठी ‘सीआयडी’कडून (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) तपासाबाबत वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहे. सांगलीतील घटनेनंतर राज्यभरातील तमाम पोलीस अधिकाऱ्यांना सावधगिरीचा इशारा देताना तपासाची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे.
राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना कोठडीतील मृत्यूबाबत खास पत्र लिहून अलर्ट केले आहे. गुन्ह्यांचा तपास कसा करावा, काय दक्षता घ्यावी, याबाबत सीआयडी व महासंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना दिल्या गेल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश आहेत.
पोलीस तपास अधिकाऱ्याने चौकशीचे तंत्र अवगत करावे, स्वत:चे कौशल्य वापरावे, आरोपीस मारहाण करू नये, त्याचा शारीरिक-मानसिक छळ करू नये, तपासी अधिकाºयाने अत्याधुनिक शास्त्रीय व तंत्रज्ञानाचा तसेच लाय डिटेक्टर, पॉलीग्राफ, ब्रेन मॅपिंग, नार्को या सारख्या चाचण्यांचा वापर करावा, फॉरेन्सींक सायन्स तंत्राची मदत घ्यावी आदी सूचना देण्यात आल्या आहेत. तपासी अंमलदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचनाही घटकप्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
निनावी तक्रारींचीही दखल घ्या
निनावी तक्रारीची दखल घेऊ नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. परंतू, पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दती, वर्तवणूकीबाबत काही तक्रारी असतील, एवढेच नव्हे तर निनावी तक्रारी असतील तरी त्याची तातडीने दखल घ्यावी, त्याची चौकशी करून योग्य ती खातरजमा करावी, असे निर्देश आहेत.
पोलीस दलातून वेगळाच सूर
सांगलीतील घटनेच्या निमीत्ताने पोलिसांच्या कार्यपध्दतीबाबत सर्वत्र जनतेतून तीव्र रोष व्यक्त केला जात असताना पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांमधून मात्र वेगळाच सूर आळवला जात आहे. थर्ड डिग्री अथवा कोणतीही मारहाण न करता, आरोपीचा आदर सत्कार-मानसन्मान केल्यास तो गुन्ह्याची कबुली देईल काय, या पध्दतीने गुन्हा डिटेक्ट हाईल काय? त्यासाठी काही वेगळे तंत्र आहे का? आदी सवाल उपस्थित केले जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना डिटेक्शन हवे असते आणि मारहाण केल्याशिवाय अट्टल गुन्हेगार तोंड उघडत नाही. अशा स्थितीत वरिष्ठांनी डिटेक्शनची फार अपेक्षा करू नये, असा सूर ऐकायला मिळतो आहे. सांगलीतील घटनेनंतर राज्य पोलीस दलात डिटेक्शनसाठी एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणारे अधिकारी-कर्मचारी बॅकफूटवर आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.