पोलिसांना मिळाली नवी वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:41 AM2021-05-14T04:41:24+5:302021-05-14T04:41:24+5:30
फोटो यवतमाळ : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टीमअंतर्गत ‘डायल ११२’ उपक्रम राबविण्यात येत आहे. ...
फोटो
यवतमाळ : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र इमरजन्सी रिस्पॉन्स सिस्टीमअंतर्गत ‘डायल ११२’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यात गस्त घालण्यासाठी पोलिसांना ५४ जीप व ९५ दुचाकी प्राप्त झाल्या. गुरुवारी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या वाहनांचे पोलीस विभागाला हस्तांतरण करण्यात आले.
पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाला आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री भुमरे यांनी नवीन जीपचे विधिवत पूजन केले. नंतर हिरवी झेंडी दाखवून वाहने पोलीस विभागाकडे हस्तांतरित केली. प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी यापूर्वी पोलिसांच्या मदतीसाठी, अग्निशमन सेवेसाठी तसेच रुग्णवाहिकेसाठी विशिष्ट क्रमांक असून, त्याच धर्तीवर आपत्कालीन मदतीसाठी ‘डायल ११२’ हा क्रमांक उपलब्ध झाल्याचे सांगितले.
जिल्ह्याला नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत ५४ जीप व ९५ दुचाकींसाठी सहा कोटी ४४ लाख रुपये जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आले आहेत. संचालन अशोक कोठारी यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. खांडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख प्रदीप परदेशी, अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे, राखीव पोलीस निरीक्षक अरविंद दुबे आदी उपस्थित होते.