एसपींच्या ट्रिटमेंटवर पोलीस खूश

By admin | Published: February 12, 2017 12:14 AM2017-02-12T00:14:41+5:302017-02-12T00:14:41+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या कार्यशैलीने सध्या जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी जाम खूश आहेत.

Police happy on SP's treatment | एसपींच्या ट्रिटमेंटवर पोलीस खूश

एसपींच्या ट्रिटमेंटवर पोलीस खूश

Next

थेट संपर्काची मुभा : छुटपूटऐवजी धडक कामगिरीचा सल्ला
राजेश निस्ताने   यवतमाळ
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या कार्यशैलीने सध्या जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी जाम खूश आहेत. पहिल्यांदाच आम्हाला एवढा सन्मान मिळतोय अशा प्रतिक्रीया ऐकायलो मिळत आहेत.
एम. राज कुमार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारून महिना लोटला आहे. सतत ‘देवाण-घेवाणी’च्या भानगडीत राहणाऱ्या पोलिसांना अद्याप त्यांचा अंदाज आला नसला तरी अन्य बहुतांश पोलीस कर्मचारी मात्र एसपींच्या कामकाजाच्या पद्धतीवर चांगलेच खूश आहेत.
एसपींनी वणी, पुसद व अन्य काही भागात भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. पोलीस खात्याची प्रतिष्ठा राखा, ती मलीन होऊ देऊ नका, सामान्य कर्मचाऱ्यांना आधार वाटेल अशी वागणूक ठेवा, तुमचे पोलीस म्हणून इम्प्रेशन पडेल असा पेहराव व वर्तणूक ठेवा, छुटपूट धाडी घालू नका, दोन-चार दारूच्या बॉटल पकडणे ही कामगिरी होऊ शकत नाही, ती कुणीही सहज करू शकतो. त्याऐवजी धडक कामगिरी करा, अशा सूचना दिल्या. त्यानंतर चंद्रपूरकडे दारू घेवून जाणाऱ्या वाहनांविरूध्द वणीत धडक मोहिम सुरू झाली.
एकाचवेळी सर्वच बंदोबस्तात कसे?
ठाण्यातील सर्वच पोलीस कर्मचारी एकाचवेळी बंदोबस्ताला पाठविण्याच्या पद्धतीवर एम. राज कुमार यांनी आक्षेप घेतला. त्याऐवजी २५ ते ३० टक्के कर्मचाऱ्यांनी बंदोबस्ताला जावे, नंतर दुसऱ्या तुकडीने बंदोबस्त करावा म्हणजे कुणावर ताण येणार नाही, असा मध्यम मार्ग त्यांनी सांगितला. पाच-दहा कर्मचारी टपरीवर जावून चहा पिण्याच्या पद्धतीवरही त्यांनी हरकत घेतली. त्याऐवजी कुण्या एकाला पाठवून चहा बोलविण्याची सवय लावा, त्यामुळे समाजात पोलिसांची इमेज राहील, असेही सूचविले आहे.
कमांडोंची हवी वेगळी ओळख
कमांडो व तत्सम अन्य पथकांमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करावी, आपला पेहरावही वेगळा ठेवावा, त्यासाठी थेट कंपन्यांशी बोलून ५० टक्के सवलतीच्या दरात दर्जेदार गणवेश, शूज, गॉगल आदी साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी बोलून दाखविली. पोलिसांना आपला मोबाईल क्रमांक देवून कोणत्याही क्षणी महत्त्वाच्या कामासाठी थेट संपर्काची मुभा दिली.
कर्मचाऱ्यांबाबत लवचिक धोरण
कर्मचाऱ्यांबाबत एसपींचे धोरण लवचिक असल्याचे सांगितले जाते. आर्णी प्रकरणात निलंबित झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले असून त्यांना तेथेच नियुक्तीही देण्यात आली. सहसा अशा निलंबितांना मुख्यालय, नियंत्रण कक्षात पाठविले जाते. एसपींनी मात्र या परंपरेला फाटा देऊन त्यांना पुन्हा सन्मान बहाल केला. यापूर्वी ‘अधिकाऱ्यांना सन्मान आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई’ अशी ट्रिटमेंट होती. मात्र प्रशासनातील ‘चेंज’नंतर या ट्रिटमेंटमध्येही अगदी उलटा चेंज कर्मचारी अनुभवत आहेत.

अवैध धंदे, डिटेक्शनचे धोरण मात्र गुलदस्त्यात
वसुली, सरबराईत ‘इन्टरेस्ट’ ठेवणारे पोलीस कर्मचारी मात्र अद्याप संभ्रमावस्थेत पाहायला मिळत आहेत. दारू, जुगार, अवैध प्रवासी वाहतूक व अन्य अवैध धंद्यांबाबत एसपींनी अद्याप ठोस धोरण व कार्यशैली निश्चित न केल्याने ही मंडळी अस्वस्थ आहे. महिना लोटूनही त्यांना अद्याप दिशा सापडलेली नाही. अवैध धंद्यांबाबत ‘जैसे थे’ स्थिती असल्याने पूर्वीप्रमाणेच कारभार राहण्याचा दावा हे पोलीस कर्मचारी खासगीत करीत आहेत. डिटेक्शनबाबतही अद्याप आक्रमक व आग्रही भूमिका घेतली न गेल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाबाबत तेवढे टेन्शन घेताना दिसत नाहीत.

 

Web Title: Police happy on SP's treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.