पोलीस महानिरीक्षक ग्रामीण ठाण्यात धडकले
By Admin | Published: May 10, 2017 12:20 AM2017-05-10T00:20:18+5:302017-05-10T00:20:18+5:30
पोलीस ठाण्यांमधील मालखाना व कर्मचाऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या साहित्याची अवस्था काय, याची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलीस ठाण्यांमधील मालखाना व कर्मचाऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या साहित्याची अवस्था काय, याची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव जिल्ह्यातील काही ठाण्यांची आता जाता-जाता पाहणी करणार आहे.
विठ्ठल जाधव यांची राज्याच्या कारागृह विभागाचे महानिरीक्षक म्हणून पुण्याला बदली झाली आहे. मात्र अद्याप ते कार्यमुक्त झाले नाही. त्यांचे दौरे व अकस्मात भेटी सुरूच आहेत. पोलीस ठाण्यांची स्थिती तपासण्याच्या सूचना महासंचालकांनी केल्या आहेत. पोलीस ठाण्यांचा परिसर स्वच्छ आहे का, हातकड्या, बंदुका, रिव्हॉल्वर, भाला, लाठ्याकाठ्या, हेलमेट पुरेशा संख्येने आहेत का, याची विचारणा करण्यात आली आहे. शिवाय दीड महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. त्यावेळी पूरपरिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले दोर, लाईफ जॅकेट आहेत का, हे तपासण्याचे आदेश आहे. पुरातून कुणालाही बाहेर काढता यावे यासाठी पट्टीच्या पोहोणाऱ्यांची यादी पोलीस ठाण्याला अपडेट ठेवण्याच्या सूचना आहेत. अपर महासंचालक बिपीन बिहारी यांनी केलेल्या सूचनांची खातरजमा करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. महानिरीक्षक जिल्ह्यातील पांढरकवडा, वणी व आणखी काही ठाण्यांना भेटी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या भेटीत ते महासंचालकांनी सूचविलेल्या सर्व बारकाव्यांची पडताळणी करणार आहे. महानिरीक्षक विठ्ठल जाधव बदलीवर जाता-जाताही तपासणीत स्वत:ला व्यस्त ठेवत आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्याने काही ठाणेदार नाके मुरडत असल्याचे चित्रही पहायला मिळते. बुधवारी महानिरीक्षक आणखी कोणकोणत्या ठाण्याला भेटी देतात याकडे ठाणेदारांचे लक्ष लागले आहे.
नापास ठाणेदारांवर कारवाई कधी ?
काही दिवसांपूर्वी महासंचालकांच्या सूचनेवरून जिल्ह्यात ठाणेदारांचे स्टिंग आॅपरेशन राबविले गेले होते. त्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठाण्यात बनावट फिर्यादी पाठवून पोलिसांकडून मिळणारी ट्रीटमेंट तपासली गेली. यातील ठाणेदारांवर कारवाईचे निर्देश संबंधित पोलीस अधीक्षकांना दिले गेले होते. मात्र त्यानंतरही या ठाणेदारांना महानिरीक्षकांनी पेशीत बोलविल्याचे सांगितले जाते. स्टिंग आॅपरेशनमध्ये नापास झालेल्या ठाणेदारांवर कारवाई काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.