पोलीस महानिरीक्षकांची उमरखेडला भेट
By Admin | Published: July 6, 2017 12:53 AM2017-07-06T00:53:46+5:302017-07-06T00:53:46+5:30
शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून शहराची शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,
छगन वाकडे : शांतता भंग करणाऱ्यांची गय नाही, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून शहराची शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गत आठवड्यात उमरखेड शहरात व्हॉटस्अॅपवरील मजकुराने तणाव निर्माण झाला होता. येणाऱ्या सण-उत्सवामध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बुधवारी उमरखेडला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. उमरखेड येथे घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण माहिती घेतली आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी घडलेल्या घटनांचाही आढावा घेण्यात आला. पोलीस शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर करडी नजर ठेवून असून अशा गुंडांना तडीपार करण्याची सूचना त्यांनी उमरखेड ठाण्यात आयोजित बैठकीत दिली. शहरात पोलीस बंदोबस्तासाठी किती बळ लागेल, याचाही त्यांनी आढावा घेतला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड, ठाणेदार हनुमंत गायकवाड उपस्थित होते.