पिस्तूल तस्करीचा पोलीस तपास टुणकीवर केंद्रित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:03 PM2018-02-03T22:03:30+5:302018-02-03T22:04:04+5:30
अग्निशस्त्र खरेदी-विक्रीच्या गुन्ह्याचा तपास बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टुणकी येथे केंद्रित झाला आहे. पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून महत्त्वाचे धागेदोरे घेवून बुलडाण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अग्निशस्त्र खरेदी-विक्रीच्या गुन्ह्याचा तपास बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टुणकी येथे केंद्रित झाला आहे. पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून महत्त्वाचे धागेदोरे घेवून बुलडाण्यात आले आहेत. याच प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी दुसरेही पथक संग्रामपूरकडे रवाना झाले आहे.
अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेला आरोपी रवींद्र ऊर्फ रवी गणेश उमाळे (३५) रा.टुणकी (ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा) व खरेदी करणारे मंडी टोळीतील राम ऊर्फ चिमणलाल शर्मा, नीलेश धरमदास सोनोरे, चंद्रप्रकाश ऊर्फ तातू रमाकांत मुराब यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. काँग्रेस नगरसेवक सलीम शहा सुलेमान शहा ऊर्फ सलीम सागवान (रा.यवतमाळ) याने वैद्यकीय कारण पुढे करत न्यायालयाकडे जामीन मागितला. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या कोठडीतूनच वैद्यकीय उपचार घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
आरोपींच्या कोठडीत वाढ झाल्याने टोळीविरोधी पथकाने तपासाची दिशा बुलडाण्यातील टुणकी येथे केंद्रित केली आहे. अग्निशस्त्र तस्कर रवी उमाळे याच्यासोबत आणखी कोण कोण जुळला आहे याचा शोध घेण्यासाठी दुसरेही पोलीस पथक शनिवारी सायंकाळी बुलडाणाकडे रवाना झाले आहे. यवतमाळातील आणखी कुठल्या लिंक या तस्काराशी जुळल्या आहेत काय याचा तपास पोलीस घेत आहे.