यवतमाळात ऑनलाइन भिंगरी जुगार जोमात, लाखोंची उलाढाल; पोलीस कोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 02:47 PM2022-02-10T14:47:00+5:302022-02-10T14:48:58+5:30
शहरात प्रमुख ठिकाणीच हे ऑनलाईन भिंगरी जुगार अड्डे सुरू आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल येथे होेते. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना नादी लावण्याचे काम या जुगार अड्ड्यांवर केले जात आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील अवैध धंदे कुठल्याही परिस्थितीत चालणार नाही, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले. त्यानंतरही वणीत सुरू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर थेट अमरावतीतील पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली. त्यानंतर दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली. असे असले तरी यवतमाळ मुख्यालयात मात्र ऑनलाईन भिंगरी जुगार जोरात सुरू आहे.
जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ऑनलाईन भिंगरी जुगार कारवाईच्या कक्षेत येतो. आर्णी मार्गावरील जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोनवेळा धाडी घातल्या. एकदा अवधूतवाडी पोलिसांनीही धाड घातली. मात्र, नंतर मधुर संबंध जुळले. शहरात प्रमुख ठिकाणीच हे ऑनलाईन भिंगरी जुगार अड्डे सुरू आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल येथे होेते. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना नादी लावण्याचे काम या जुगार अड्ड्यांवर केले जात आहे. पूर्वी गांधी चौकात हा जुगार खेळला जात होता. नंतर याची शाखा आर्णी रोडवर पोहोचली. त्यानंतर मेडिकल चौक परिसरातील एका दुकानात हा जुगार सुरू आहे. शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या काॅम्पलेक्समध्येही जुगार सुरू आहे. वाघापूर नाक्यावरही बिअर शॉपीला लागून असलेल्या परिसरातही भिंगरी जुगार खेळला जात आहे.
पोलीस अधीक्षक अवैध धंदे खपवून घेणार नाही, असे वारंवार निर्देश देतात. मात्र, त्यांच्या निवासस्थान परिसर व कार्यालय परिसरापासून काही मीटर अंतरावरच हे अवैध धंदे चालविले जात आहे. शहरातील पोलिसांना या अवैध जुगार अड्ड्यांची पुरेपूर माहिती आहे. दाखविण्यासाठी दोन-तीनदा धाडी टाकायच्या व नंतर आपली सेटिंग लावून घ्यायची, हा प्रकार नित्याचाच झाला आहे. राजरोसपणे सुरू असलेला हा अवैध व्यवसाय मोडीत काढण्याचे आव्हान आता पोलीस अधीक्षकांपुढेच उभे ठाकले आहे.
पोलीस कर्मचारीच भागीदार
जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या शोधपथकातील पोलीस कर्मचारीच ऑनलाईन भिंगरी जुगाराच्या अड्ड्याचा भागीदार आहे. पोलीस अधीक्षकांची इतकी कठोर भूमिका असतानाही त्या कर्मचाऱ्याने थेट भागीदारीत ऑनलाईन भिंगरी जुगार सुरू केला आहे. त्याचा अड्डा शासकीय रुग्णालयाच्या समोरच्या परिसरात सुरू आहे. शहर ठाण्यातील काही अधिकारी, कर्मचारी तेथे पोहोचले असता या कर्मचाऱ्यानेच मध्यस्थी घडवून आणली.