"कुणाशी बोलतोय माहितीये का"; सर न म्हटल्यानं पोलीस अधिकाऱ्याची डिलिव्हरी बॉयला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:59 IST2025-03-05T13:50:42+5:302025-03-05T13:59:40+5:30

यवतमाळमध्ये सर न म्हटल्याने पोलीस अधिकाऱ्याने डिलिव्ही बॉयला मारहाण केली

Police officer beats up delivery boy for not calling him sir in Yavatmal | "कुणाशी बोलतोय माहितीये का"; सर न म्हटल्यानं पोलीस अधिकाऱ्याची डिलिव्हरी बॉयला मारहाण

"कुणाशी बोलतोय माहितीये का"; सर न म्हटल्यानं पोलीस अधिकाऱ्याची डिलिव्हरी बॉयला मारहाण

Yavatmal Crime: सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच पोलिसांच्या वर्दीचा धाक असल्याचे पाहायला मिळत आलं आहे. कायद्याचा, वर्दीचा धाक दाखवून अनेकदा काही पोलीस कर्मचारी सामान्य नागरिकरांना धमकावण्याचा प्रयत्न करत असतात. असाच काहीसा प्रकार यवतमाळमध्ये एका डिलिव्हरी बॉयसोबत घडला आहे. केवळ सर न म्हटल्याने एका पोलीस निरीक्षकाने डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याचे  सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

यवतमाळच्या आर्णीमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मोबाईलवर बोलताना केवळ सर म्हटलं नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याची घटना घडली. फोनवर सर म्हटल्याने पोलीस अधिकाऱ्याने डिलिव्हरी बॉयला आधी शिवीगाळ केली आणि त्याचा पत्ता विचारला. एवढ्यावरच न थांबता पोलीस अधिकाऱ्याने डिलिव्हरी बॉयच्या ऑफिसमध्ये जात त्याला मारहाण देखील केली. हा सगळा प्रकार ऑफिसमधल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

धीरज गेडाम असे मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो आर्णी शहरातील सनराईज लॉजिस्टीक या कंपनीत पार्सल पोहोचविण्याचे काम करतो. त्यासाठी त्याला प्रत्येक डिलिव्हरीमागे दहा रुपये मिळतात. त्यानुसार काम करत असताना ज्यांचे पार्सल आहे त्यांना धीरज फोन करुन माहिती मिळवत होता. एका पार्सलवर केशव ठाकरे असे नाव आणि मोबाइल नंबर लिहीला होता. त्यावर फोन करुन धीरजने केशव ठाकरे बोलता का, असं विचारलं. एवढ्याच गोष्टीचा केशव ठाकरे यांना राग आला. त्यांनी धीरजला, केशव ठाकरे काय तुझा नोकर आहे का, कुणाशी बोलतोय तू हे तुला माहिती आहे का, मी इथला ठाणेदार आहे, असं म्हणत दमदाटी केली.

त्यावर धीरजने याच्यावर फक्त तुमचं नाव लिहीलं आहे, तुमचे पद नाही, असं म्हटलं. तेव्हा केशव ठाकरे यांनी सर, साहेब म्हणण्याची काही पद्धत नाहीये का, तु कुठे आहे ते सांग, तुलाच व्हेरीफाय करतो, असं म्हटलं. यावर ठाकरे यांनी धीरजला शिव्या देखील दिल्या. त्यानंतर एका सहकाऱ्यासह केशव ठाकरे हे थेट धीरजच्या ऑफिसमध्ये गेले. तिथेही त्यांनी धीरजला शिवीगाळ करत मारहाण केली. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
 

Web Title: Police officer beats up delivery boy for not calling him sir in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.