चोरट्याचे धाडस, चक्क पोलीस ठाण्यातच केली चोरी; अंमलदाराची दुचाकी घेऊन पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 04:43 PM2022-04-13T16:43:45+5:302022-04-13T17:01:28+5:30
ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला.
यवतमाळ : शहरात पोलिसांचा धाक नाममात्र शिल्लक राहिलेला नाही. बुधवारी पहाटे १९ वर्षीय चोरट्याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात जावून दुचाकीचे लॉक तोडले. ती दुचाकी घेवून तो पसार झाला. डायरी अंमलदार असलेल्या पोलीस नाईक कर्मचाऱ्याची ही दुचाकी होती. सकाळी ड्युटी संपल्यानंतर दुचाकी चोरी गेल्याचे उघडकीस आले.
पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेण्यासाठी गेले. मात्र, त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला.
टीशर्ट घातलेला एक युवक पहिले ठाण्यात आला. त्याने तेथे ठेवलेल्या दुचाकींची लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. पोलीस येतील याचा अंदाज येताच तो पोलीस ठाण्याच्या बाहेर आला. नंतर त्याने ठाणेदाराच्या कक्षामागून अरुंद बोळीतून पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला. तेथे बानते यांच्या दुचाकीचे लॉक तोडले व ती दुचाकी घेवून पसार झाला. हा घटनाक्रम पाहिल्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेणे सुरू केले.
चोरी करणारा युवकच आला तक्रार देण्यास
बुधवारी दुपारी १ वाजता दुचाकी चोरणारा सुरेश उर्फ जादू नरेश कलांडे (१९) रा. पारवा हा पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने हातावर ब्लेडने वार केले होते. स्वत:च्या आईच्या विरोधातच तक्रार देण्यासाठी ठाण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला दुचाकी चोर हाच आहे हे लक्षात येताच पोलिसांनी जादूला ताब्यात घेतले. काही वेळाने त्याची आई अनिता कलांडे ही पाेलीस ठाण्यात पोहोचली. मुलगा व्यवस्थित राहत नसून तो वाद करून खोटी तक्रार देण्यासाठी आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तसेच त्याने दुचाकी घरी आणल्याचेही सांगितले. मुलाचा कायमचा बंदोबस्त करा, त्याला कारागृहाबाहेर पडू देऊ नका अशी आर्जव अनिता कलांडे यांनी अवधूतवाडी पोलिसांकडे केली.
पोलीस ठाण्यातून गाडी चोरली, पोलीस काय बिघडविणार
सराईत चोर असलेल्या सुरेश उर्फ जादू कलांडेने चोरीची दुचाकी घेवून पारवा हे गाव गाठले. गावात जावून त्याने सर्वांना सांगितले, पोलीस माझे काहीच वाकड करणार नाही, पोलिसाचीच दुचाकी पोलीस ठाण्यातून आणली आहे असे म्हणून जादूने स्वत:च्या आईसोबतच वाद घालणे सुरू केले. आधार कार्डासाठी टीसी हवी या कारणावरून तो आई व बहिणीसोबत भांडत होता. जादूच्या कारनाम्यामुळे कलांडे कुटुंबीय त्रस्त झाले आहे.