आरोपीच्या हल्ल्यात पोलीस जमादाराचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 08:46 AM2018-11-26T08:46:54+5:302018-11-26T10:21:27+5:30

आरोपीनं केलेल्या हल्ल्यात मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू कुडमेथे (वय 50 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे.

Police Officer died in accused attack in Yavatmal | आरोपीच्या हल्ल्यात पोलीस जमादाराचा जागीच मृत्यू

आरोपीच्या हल्ल्यात पोलीस जमादाराचा जागीच मृत्यू

Next
ठळक मुद्देआरोपीच्या हल्ल्यात पोलिसाचा मृत्यूजमादार राजेंद्र कुळमेथेंच्या डोक्याला, हाताला व तोंडाला गंभीर जखमापोलिसांची सुरक्षा रामभरोसे

वणी (यवतमाळ) - मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे  रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी आरोपीनं अचानक पोलिसांवर हल्ला चढवला. यात एका पोलिसाचा मृत्यू झाला तर  दोन पोलीस जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या हिवरी येथील ही घटना आहे. मारेगावचे पोलीस निरीक्षक वडगावकर यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार मधुकर निळकंठ मुके ( वय ५२ वर्ष),  हवालदार राजेंद्र बाजीराव कुळमेथे ( वय ४८ वर्ष) आणि पोलीस शिपाई प्रमोद फुफरे (वय ३१ वर्ष) अजामीनपात्र वारंट घेऊन आरोपी अनिल मेश्राम  (वय ३५वर्ष) याला ताब्यात घेण्याकरता त्याच्या घरी सोमवारी (26 नोव्हेंबर) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास गेले.

पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला आवाज देऊन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. तेव्हा मी येत नाही. तुम्ही माझे काय करता ते मी पाहून घेतो. मला हात लावून दाखवा असे म्हणत आरोपी आणि त्याची आई इंदिरा मेश्राम यांनी लाकडी दांडक्याने पोलिसांवर हल्ला चढवला.

अचानक झालेल्या हल्ल्याने पोलीस घाबरून गेले. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांच्या डोक्याला, हाताला आणि तोंडाला गंभीर मार लागल्याने ते खाली कोसळले. पोलिसांनी स्वरक्षणासाठी हल्ला रोखण्याचे प्रयत्न केले. परंतु आरोपीच्या आक्रमकतेपुढे पोलीस हतबल झाले. यावेळी पोलीस हवालदार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे या हल्यात गंभीर जखमी झाले.

आरोपीच्या आक्रमक भूमिकेमुळे घाबरून पोलिसांनी मोठ-मोठ्याने आवाज देत गावातील लोकांना मदतीला बोलविले. मात्र आरोपी अंधारात पळून गेला. यावेळी गावातील गुणवंत देरकर आणि सहकारी मदतीला धावून आले. गंभीर जखमी राजेंद्र कुळमेथे यांना घेऊन पोलीस माघारी मारेगावला आले.

राजेंद्र कुळमेथेसह सर्व जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी कुळमेथे यांना मृत घोषित केले. तर मधुकर मुके, प्रमोद फुफरे यांच्यावर उपचार सुरू आहे. घटनेची फिर्याद हवालदार मधुकर मुके यांनी मारेगाव पोलिसात दिली.

Web Title: Police Officer died in accused attack in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.