पोलीस अधिकारी-शिपायात हाणामारी, दोघेही निलंबित; वणी पोलीस ठाण्यातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 11:47 PM2022-09-30T23:47:26+5:302022-09-30T23:49:29+5:30

या घटनेने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच झालेल्या या हाणामारीच्या घटनेनंतर पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.

Police officer-soldier clash, both suspended; Incident at Vani Police Station | पोलीस अधिकारी-शिपायात हाणामारी, दोघेही निलंबित; वणी पोलीस ठाण्यातील घटना 

पोलीस अधिकारी-शिपायात हाणामारी, दोघेही निलंबित; वणी पोलीस ठाण्यातील घटना 

Next

- संतोष कुंडकर

वणी (यवतमाळ) : होमगार्डला सोबत का नेले, या कारणावरून येथील पोलीस ठाण्यात कार्यरत पीएसआय व एका जमादारात गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यातच वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. याप्रकरणी चौकशीनंतर शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले. या घटनेने पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातच झालेल्या या हाणामारीच्या घटनेनंतर पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे व नायक पोलीस धीरज चव्हाण असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे हे कर्तव्यावर असताना त्यांनी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यात असलेल्या दोन होमगार्ड कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जात होते. यावर स्टेशन डायरीवर असलेल्या नायक पोलीस धीरज चव्हाण याने आक्षेप घेतला आणि येथेच वादाला तोंड फुटले. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांनीही एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या सर्व प्रकाराची चर्चा शुक्रवारी दुपारी वणी शहरात होती. 

दरम्यान, वणीचे एसडीपीओ संजय पुज्जलवार यांनी या प्रकरणाची चौकशी केली. वणी पोलीस ठाण्यात लावून असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात हा सारा प्रकार दिसून आला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची तातडीने दखल घेत, या दोघांचीही बयाणे नोंदविण्यासंदर्भात डीवायएसपी पुज्जलवार यांना आदेश दिले. दोघांचेही बयाण नोंदविल्यानंतर या संपूर्ण हाणामारी प्रकरणाचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी विभागीय चौकशीच्या अधीन राहून शुक्रवारी सायंकाळी शिवाजी टिपुर्णे व धीरज चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

अनेक दिवसांपासून सुरू होती कुरबूर
पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपुर्णे यांच्याबद्दल यापूर्वीदेखील अनेक तक्रारी झाल्या. नायक पोलीस धीरज चव्हाण हादेखील अनेकदा वादात अडकल्याने त्याचीही चौकशी झाली. परंतु, वरिष्ठांच्या मर्जीमुळे दोघांविरुद्धही कारवाई झाली नव्हती. गेल्या अनेक दिवसांपासून शिवाजी टिपुर्णे व धीरज चव्हाण यांचे आपसांत पटत नव्हते. वारंवार या दोघांमध्ये कुरबुरी होत होत्या, अशी पोलीस दलात चर्चा आहे. शुक्रवारी रात्री या दोघांमधील वाद विकोपाला जाऊन दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या घटेनमुळे पोलीस दलाच्या शिस्तीला गालबोट लागले आहे.

'घटना अतिशय गंभीर'
वणी पोलीस ठाण्यात घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी विभागीय चौकशीच्या अधीन राहून मी पोलीस उपनिरीक्षक व नायक पोलीस या दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले आहे. - डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा पोलीस अधीक्षक.

Web Title: Police officer-soldier clash, both suspended; Incident at Vani Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.