पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:32 PM2018-05-31T23:32:28+5:302018-05-31T23:32:28+5:30
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. वाकडे सायंकाळी सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या काही तासपूर्वी त्यांनी बदल्यांच्या या आदेशावर स्वाक्षरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
वाकडे सायंकाळी सेवानिवृत्त होत आहे. त्याच्या काही तासपूर्वी त्यांनी बदल्यांच्या या आदेशावर स्वाक्षरी केली. त्यात पांढरकवड्याचे ठाणेदार असलम खान यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात जनावरांची तस्करी होत असताना असलम खान यांना मिळालेली मुदतवाढ पाहता ‘गृह’विभाग त्यांच्यावर ‘प्रसन्न’ झाल्याचे मानले जाते. येथील पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांची अमरावती ग्रामीण पोलीस दलात नेमणूक करण्यात आली आहे. कळंबचे ठाणेदार बबन कऱ्हाळे यांना वाशिमला पाठविण्यात आले. मुकुटबनचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांची बुलडाणात बदली करण्यात आली आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्यात आणण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत.
शिरपूरचे ठाणेदार सागर इंगोले यांना अमरावती ग्रामीण, सुभाष दुधाळ बुलडाणा, सुरज बोंडे अमरावती ग्रामीण, बाळू जाधव वाशिम, दिलीप मसराम यांची अकोल्यात बदली करण्यात आली आहे. धीरज चव्हाण यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. अमरावती ग्रामीणमधून सतीश चवरे, निलेश सुरडकर, संदीप येकाडे हे तीन सहायक पोलीस निरीक्षक जिल्ह्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या. अमरावती ग्रामीणचे सुरेश कन्नाके, मयूर तेलंग, विजय मुसनवाड, अकोल्याचे संतोष केदासे, नितीन बलीगवार या फौजदारांना यवतमाळ जिल्ह्यात नेमणूक देण्यात आली आहे.
ठाणेदारकीसाठी फिल्डींग
महासंचालक व महानिरीक्षक स्तरावरून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी झाल्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या स्तरावरील नियुक्त्यांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात बाहेरुन नियुक्ती झालेल्या अधिकाऱ्यांनी महत्वाचे ठाणे मिळविण्यासाठी राजकीय मोर्चेबांधणी चालविली आहे. तर कनिष्ठ पोलीस अधिकारी सोईच्या नियुक्त्यांसाठी प्रयत्नरत आहेत. यातील काहींनी बदली रद्द करण्यासाठी तर कुणी मुदतवाढ मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे.