पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:00 AM2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:10+5:30
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छेने व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत. सत्ताधारी नेत्याने जिल्ह्यातील अशा १६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करून पोलीस प्रशासनाला फेरबदलासाठी पाठविल्याचे सांगितले जाते. बहुतांश ठाण्यात फेरबदल व्हावे व ते आपल्या भेटीगाठीसाठी यावे, हाच यामागील छुपा उद्देश आहे. त्या १६ अधिकाऱ्यांमध्ये वणी, पांढरकवडा, नेर, दिग्रस, दारव्हा, पुसद यासारख्या मोठ्या ठाण्यांचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना यावर्षीच्या सार्वत्रिक बदल्यांचे वेध लागले आहेत. काही अधिकारी परिक्षेत्राबाहेर, तर काही जिल्ह्याबाहेर जाणार आहेत.
३१ जुलैपूर्वी यावर्षीच्या बदल्या जाणार आहेत. राज्यस्तरीय बदल्यांमध्ये परिक्षेत्राबाहेर नियुक्त्या होतील, नंतर परिक्षेत्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात नियुक्त्या केल्या जातील. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातून कळंबचे ठाणेदार विजय राठोड, बाभूळगावचे ठाणेदार सतीश जाधव, यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार संजय शिरभाते सहा वर्षांची सलग सेवा झाल्याने परिक्षेत्राबाहेर जाणार आहेत. तर मुकुंद कुलकर्णी, संजय डहाके हे पोलीस निरिक्षक जिल्ह्याबाहेर जाणार आहेत. परिक्षेत्राबाहेर जावू शकणाऱ्या सहायक पोलीस निरिक्षकांमध्ये मनोज लांडगे, पाचकवडे, प्रशांत गिते, झळके, अनिता गायकवाड, अनिल राऊत या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. सध्या जिल्ह्यातच राहणाºया पोलीस अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी नियुक्त्या मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांनी वडकी, पारवा, लाडखेड, वडगाव(जं) या आपल्या क्षमतेच्या ठाण्यांवर लक्ष केंद्रीत केले. लाडखेड, वडगाव या ठाण्यांची नियुक्ती माझ्या कन्सेंटशिवाय नाही, असा संदेश राजकीय स्तरावरून प्रशासनाकडे पोहोचला आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातही इच्छुकांनी राजकीय मार्गाने महत्त्वाचे ठाणे मिळविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न चालविले आहे.
राजकीय मार्गाने १६ अधिकाऱ्यांची यादी
जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छेने व्हाव्या यासाठी प्रयत्न आहेत. सत्ताधारी नेत्याने जिल्ह्यातील अशा १६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार करून पोलीस प्रशासनाला फेरबदलासाठी पाठविल्याचे सांगितले जाते. बहुतांश ठाण्यात फेरबदल व्हावे व ते आपल्या भेटीगाठीसाठी यावे, हाच यामागील छुपा उद्देश आहे. त्या १६ अधिकाऱ्यांमध्ये वणी, पांढरकवडा, नेर, दिग्रस, दारव्हा, पुसद यासारख्या मोठ्या ठाण्यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारीही सोयीने बदलविता येतात काय, यादृष्टीने चाचपणी केली जात आहे. पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी यांची बदली निश्चित मानली जात आहे.
एम. राज कुमार ६३ वर्षांत सर्वाधिक काळ एसपी
१९५७ पासून तर आतापर्यंत गेल्या ६३ वर्षांत सर्वाधिक काळ यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक राहिलेले विद्यमान एसपी एम. राज कुमार हे एकमेव आहेत. ६ जानेवारी २०१७ ला एम. राज कुमार यांनी यवतमाळच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांचा तीन वर्षे सात महिन्यांचा अर्थात ४३ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण होतो आहे. यापूर्वी अंकुश धनविजय हे तीन वर्ष पाच महिने येथे एसपी राहिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ एसपी होवून गेले. त्यापैकी एस.एस. विर्क हे एकमेव राज्याच्या पोलीस महासंचालक पदापर्यंत जाऊ शकले. इतर काहींनी अपर महासंचालक, महानिरीक्षकांपर्यंत मजल मारली. यापूर्वी अमितेशकुमार येथून सोलापूर ग्रामीणला गेले होते. आता एम. राज कुमार त्याच पॅटर्ननुसार नाशिक ग्रामीणला जातात का, याकडे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
‘आयपीएस’ला यादीची प्रतीक्षा, भुजबळांचा जोर
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांकडे सर्वांच्या नजरा आहेत. या आठवड्याच्या अखेरीसपर्यंत आयपीएसच्या बदल्यांची यादी जारी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात एसपी होण्यासाठी चौघांची नावे चर्चेत असली तरी त्यात बुलडाणा एसपी दिलीप भुजबळ पाटील यांचा जोर सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. भुजबळ यांची मुंबईतील ‘बुलेट प्रुफ जॅकेट खरेदी’ प्रकरणातील चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या ‘डीआयजी’ पदावरील बढतीसही विलंब होत असल्याचे सांगितले जाते.