एटीएम फुटत असताना पोलिसांची दोन वेळा गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:24 PM2019-03-04T21:24:38+5:302019-03-04T21:25:10+5:30
शहरातील एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मार्इंदे चौकातील एटीएमच्या तोडफोडीचा गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच पुन्हा पोस्टल मैदानाजवळच्या तिरंगा चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे ३.४५ वाजता ही घटना घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. मार्इंदे चौकातील एटीएमच्या तोडफोडीचा गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच पुन्हा पोस्टल मैदानाजवळच्या तिरंगा चौकातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. सोमवारी पहाटे ३.४५ वाजता ही घटना घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र त्यानंतरही शहर पोलसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत या घटनेची तक्रार घेतली नसल्याचा आरोप आहे.
तिरंगा चौकात इंडीयन ओवरसिस बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी ही घटना उघडकीस येताच ओवरसिस बँकेच्या कर्मचाऱ्याने शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे कार्यरत असलेल्या ड्यूटी आॅफीसरने तक्रार नोंदविण्यासाठी सायंकाळी या, असे सांगून परत पाठविले. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकरणाची तक्रार येताच नोंद घेऊन घटनास्थळाला भेट देणे आवश्यक होते. मात्र कर्तव्यावर असलेल्या अधिकाºयाने याकडे चक्क दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वेळेवरच घटनास्थळ पाहणी केली असती तर तेथे आरोपीच्या बोटाचे ठसे व इतरही काही महत्वपूर्ण सुगावा मिळण्याची शक्यता होती. मात्र कोणीच तातडीने तिथे फिरकले नाही.
इंडीयन ओवरसिस बँकेचे एटीएम फोडण्यासाठी एकच व्यक्ती तेथे आला होता. त्याने एटीएम मशीनचे पुढील कव्हर काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, चोरटा एटीएम फोडत असताना तेथून पोलिसांच्या रात्रगस्ती पथकाचे वाहन दोन वेळा गेले. मात्र त्यांचे लक्ष एटीएमकडे गेले नाही. चोरट्याने बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर एटीएम फुटत नसल्याने शेवटी काढता पाय घेतला. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये चित्रित झाला आहे. इतकेच नव्हेतर, आरोपीचा चेहरासुद्धा स्पष्ट आला आहे. पोलीस टाळाटाळ का करतात, असा प्रश्न आहे.
ड्यूटी आॅफिसरचा फंडा
पहाटे घडलेल्या घटनेची तक्रार देण्यास आलेल्या बँक कर्मचाऱ्यांना चक्क सायंकाळी बोलावण्यात आले. पोलीस ठाण्यात कार्यरत ड्यूटी आॅफिसर जाणीवपूर्वक टाळाटाळ करतात. ड्यूटी संपण्यास काही तास शिल्लक असताना फिर्यादीला बसवून ठेवले जाते. पुढच्या डीओने ही तक्रार नोंदवून सोपस्कार पूर्ण करावेत, आपण गुंतून पडू नये, यासाठी हा फंडा वापरला जातो. हा प्रकार शहर ठाण्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे.