पेंशनसाठी पोलीस कर्मचाऱ्याच्या विधवेची भटकंती
By admin | Published: February 7, 2017 01:29 AM2017-02-07T01:29:20+5:302017-02-07T01:29:20+5:30
आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी अनुकंपा पेंन्शन मिळावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्याची विधवा दारोदार भटकत आहे.
पांढरकवडा : आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी अनुकंपा पेंन्शन मिळावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्याची विधवा दारोदार भटकत आहे. परंतु अद्यापही या विधवेला पेंन्शन मिळाली नाही. तिच्या तरूण मुलाचाही मृत्यु झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले आहे.
स्थानिक इंदिरानगर येथील बेघर वसाहतीत वॉर्ड नं.६ मध्ये यमुनाबाई किसन उजवणे ही पोलीस कर्मचाऱ्याची विधवा आपली विधवा सून सुनीता, नातू कार्तीक व सुर्यकांत, नात पोर्णीमा यांच्यासह राहते. यमुनाबाईचे पती किसन उजवने (बकल नं.४५९) हे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतांना एका प्रकरणात निलंबित झाले. त्यानंतर त्यांना कर्तव्यावर परत बोलविण्यात आले. परंतु सेवा पुर्ण होण्यापुर्वीच २४ आक्टोंबर २००५ रोजी त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. तेव्हापासून त्यांची विधवा यमुनाबाई ही आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी दरमहा पतीची अनुकंपा पेंन्शन मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. पोलीस अधिक्षकांपासून, तर महासंचालक मुंबई व गृहमंत्रालयापर्यंत लेखी अर्ज विनंत्या केल्या. परंतु त्यांची दखल घेण्यात आली नाही. पतीचा मृत्यु होऊन ११ वर्षे उलटूनही पेंन्शन न मिळाल्यामुळे या कुटुंबाची रोज उपासमार होत आहे. पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचे कसेबसे पालन पोषण करणारा त्यांचा एकुलता एक तरुण मुलगा गजानन उजवणे याचासुद्धा दुर्देवी मृत्यु झाला. तेव्हापासून त्याची पत्नी, आई व तीन मुले अनाथ झाली आहे. मुलांचे पालन पोषण, त्यांचे शिक्षण करणे अशक्य झाले आहे. यमुनाबाई लोकांकडे भांडी घासण्याचे काम करुन कसेबसे जीवन व्यतीत करीत असून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित आहे.
या सर्व बाबीबाबत यमुनाबार्इंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अवगत केले. परंतु अद्याप कोणीही या गंभीर बाबीची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे यमुनाबाईचे पती किसन यांचेसोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी बकल न.४७४ व २१९ हे पण निलंबीत झाले होते. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नीला पेंशन मिळत आहे. परंतु माझ्या पतीची हक्काची पेंशन मला का मिळत नाही, असा प्रश्न यमुनाबाईने उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
प्रशासनाकडून नाचविले जात आहे कागदी घोडे
यमुनाबाई मागील कित्येक वर्षापासून पेन्शनसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे अर्ज विनंत्या करीत आहे. त्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.परंतु तीने अधिकाऱ्यांना सादर केलेले अर्ज व आवश्यक कागदपत्र हे फक्त या अधिकाऱ्यांकडून त्या अधिकाऱ्यांकडे तर त्या अधिकाऱ्यांकडून या अधिकाऱ्यांकडे पाठविल्या जात आहे. अशाप्रकारे अधिकाऱ्यांकडन कित्येक वर्षापासून कागदी घोडे नाचविल्या जात आहे. परंतु गेल्या ११ वर्षापासून तिला न्याय मिळाला नाही.