पोलीस वसाहत की पोड?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:25 PM2018-10-23T23:25:47+5:302018-10-23T23:26:39+5:30
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या पळसवाडी कॅम्पमधील पोलीस वसाहतीला जंगलाचे स्वरूप आले आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उद्रेक वाढला आहे. वराह आणि मोकाट जनावरांचा कळप या भागात धुडगूस घालत आहे. नगरपरिषद प्रशासनालाही लक्ष देण्यास उसंत नाही. यामुळे हा संपूर्ण परिसर एखाद्या मागास पोडासारखा दिसत आहे. पोलीस कुटुंब वसाहतीमधून काढता पाय घेण्याच्या वाटेवर आहेत.
पळसवाडी कॅम्प हा परिसर पोलीस वसाहत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पोलिसांचे कुटुंब वास्तव्याला आहेत. तरी या वसाहतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिसरात काटेरी वृक्ष, काचकोऱ्या, झिंगुरड्याची झाडे, अंगाला चिकटणारे काटे पसरले आहेत. या वेढ्याने विद्युत डीपीलाही घेरले आहे. यामुळे वीज गुल होण्याचा प्रश्न मोठा झाला आहे. या भागात वारंवार वीज ‘ट्रिप’ होत आहे.
या भागातील नाल्या आणि ‘शोकपिट’ बेवारस आहे. यातून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे, नाल्या आणि शोकपिट डासांच्या उद्रेकाचे केंद्र बनले आहे. यवमाळ शहरात डेंग्यूची साथ पसरली असताना नगरपरिषदेने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे. या भागाचे नगरसेवक जगदीश वाधवानी यांचे या परिसराकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले. पोलीस आणि कुटुंबीयांनी या वसाहतीच्या प्रश्नावर नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी नोंदविल्या. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे संपूर्ण परिसराला जंगलाचे स्वरूप आले आहे. या भयावह स्थितीने पोलीस कुटुंबांमध्ये दहशत पसरली आहे. डेंग्यूच्या उदे्रकावर कशी मात करावी, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. समाजाला संरक्षण पुरविणाऱ्या पोलिसांना आपल्या कुटुंबीयांसाठीही संघर्ष करावा लागत आहे.
आम्हाला वाळीत टाक ले काय?
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी लढतात. पण त्यांच्या कुटुंबीयांना नगरपरिषदेने वाळीत टाकले काय, असा प्रश्न या वसाहतीमधील नागरिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. भर उन्हाळ्यातील पाणीटंचाईतही या भागाकडे असेच दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी नोंदविली.
पोलिसदादापुढे दुहेरी संकट
गावगुंडांपासून सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या वसाहतीकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे गावगुंडांशी झुंजताना अनारोग्य आणि साथीच्या आजाराशीही झुंजण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. यातून पोलीस कुटुंबांमध्ये नगरपरिषदेप्रती रोष व्यक्त केला जात आहे.