‘मजीप्रा’ कर्मचाऱ्यांना आता पोलीस संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 11:42 PM2018-05-22T23:42:40+5:302018-05-22T23:42:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संतप्त लोकांकडून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कार्यालयातील साहित्याची होणारी नासधूस यापासून संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या येथील कार्यालयाला पोलीस संरक्षण दिले आहे. या कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील पाणी पूर्णपणे संपल्याने शहराचा पाणी पुरवठा संपुष्ठात आला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे मजीप्रा कार्यालयावर धडकत आहे. कर्मचाऱ्यांना शिविगाळ, कार्यालयातून बाहेर काढणे, कुलूप ठोकने, धक्काबुक्की करणे आदी प्रकार घडत आहे. वॉलमन जवळील ‘की’ हिसकावून वॉल उघडून टाकीतील पाणी घेणे असे प्रकार सुरु आहे. कार्यालयीन व क्षेत्रीय भागात १२ ते १४ तास काम करीत असताना अशा घटना घडत आहे. रविवार २० मे रोजी वडगाव रोड येथे शाखा अभियंता राजेंद्र आजापूंजे यांना शिवीगाळ व धक्कबुक्की करण्यात आली. हा प्रकार प्राधिकरण कर्मचाऱ्यांचे मनोबल व मानसिक खच्चीकरणाचा आहे. कामकाज करणे अशक्य झाले आहे.
अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. त्याठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाºयांना रात्री-बेरात्री परत यावे लागते. पाणी पुरवठ्याची टाकी व प्रत्यक्ष काम करीत असलेल्या भागात पोलीस संरक्षण मिळावे, असे या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान अवधूतवाडी पोलीस ठाण्याकडून संरक्षणासाठी पोलीस दिले जाणार असल्याचे सांगितले गेले.
टँकर चालकही दहशतीत
शहरात पाणी वितरण करणारे नगरपरिषदेचे टँकर चालकही चांगलेच दहशतीत आले आहे. कोणत्याही भागात टँकर घेऊन गेले की, त्या ठिकाणी पाण्यासाठी वाद होतो. अनेकदा टँकर अडवून त्यातील पाणी बळजबरीने घेण्याच्या घटना घडत आहेत.