प्रतिबंधित ‘पीजीआर’ साठ्यावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:31 PM2017-10-24T23:31:10+5:302017-10-24T23:31:21+5:30
प्रतिबंधित पीजीआर (प्लांट ग्रोथ रिझ्यूलोशन) अर्थात कृषी संजीवकाच्या गोदामावर येथील दारव्हा मार्गावरील तिरूपतीनगरात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी धाड टाकली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्रतिबंधित पीजीआर (प्लांट ग्रोथ रिझ्यूलोशन) अर्थात कृषी संजीवकाच्या गोदामावर येथील दारव्हा मार्गावरील तिरूपतीनगरात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी धाड टाकली. या ठिकाणी असलेला प्रतिबंधीत साठा वाहनातून बाहेरगावी हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या.
कीटकनाशकांच्या फवारणीतून विषबाधा प्रकरणानंतर जिल्ह्यात पोलीस आणि कृषी विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. तिरूपतीनगरातील एका घरात मोठ्याप्रमाणात कीटकनाशकांचा साठा असल्याची गोपनीय माहिती वडगाव रोड पोलिसांना मिळाली. यावरून सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार आयरे यांनी पथकासह धाड टाकली. त्यावेळी एका घरातून वाहनद्वारे प्रतिबंधित पीजीआर हलविण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी प्रतिबंधीत पीजीआर भरलेले वाहन वडगाव रोड ठाण्यात आणले. या प्रकरणाची माहिती कृषी विभागाला देण्यात आली. त्यावरून पुढील तपास सुरू होता. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात कोणतीही नोंद घेण्यात आली नव्हती.
राज्य शासनाने ३ आॅक्टोबर रोजी पीजीआरवर बंदी घातली आहे. यावर्षी फवारणीतील विषबाधेला पीजीआर जबाबदार धरले जात आहे. हा कीटकनाशक विक्रीचा एक ट्रॅप असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. तिरूपती नगरात पीजीआर तयार करून त्याची विक्री केली जात होती. याची खबरबात कोणत्याच यंत्रणेला लागली नाही. ‘परफेक्ट-जी पॉवर ग्रो’ या नावाने उत्पादन ग्रीन पॉवर अॅग्रोटेक कंपनीकडून तिरूपतीनगरात तयार केल्याचे पीजीआरच्या बॉक्सवर नमुद केले आहे. आता या प्रतिबंधित पीजीआरची निर्मिती व विक्री करणाºया कंपनीवर कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.