पोलिसांची सुटीसाठी ओरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 05:00 AM2021-02-26T05:00:00+5:302021-02-26T05:00:02+5:30
यवतमाळ जिल्ह्याचा भाैगोलिक विस्तार लक्षात घेता १०० ते १५० किलोमीटर अंतरावरील पोलीस कर्मचारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आपली तक्रार व्यक्तीश: मांडू शकत नाही. त्याबाबत तो पाठपुरावाही करू शकत नाही. पोलीस दलातील मनुष्यबळ कमी असल्याने कार्यालयीन कामकाजासाठीसुद्धा त्यांना आवश्यक सुटी मिळणे शक्य नाही. अशा स्थितीत कर्मचारी समाधान कक्षाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशाविरुद्ध जाता येत नाही. या बाबीचा बऱ्याचदा जाचक पद्धतीने वापर होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या स्थानिक वरिष्ठांकडून न सोडविल्या जाणाऱ्या समस्यांसाठी जिल्हा प्रमुखांकडे दाद मागण्याची सोय करण्यात आली आहे. समाधान कक्षाच्या माध्यमातून कर्मचारी आपली गाऱ्हाणी वरिष्ठांकडे मांडतात. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या स्थानिक वरिष्ठांकडून रजा मिळत नसल्याच्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्याचा भाैगोलिक विस्तार लक्षात घेता १०० ते १५० किलोमीटर अंतरावरील पोलीस कर्मचारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आपली तक्रार व्यक्तीश: मांडू शकत नाही. त्याबाबत तो पाठपुरावाही करू शकत नाही. पोलीस दलातील मनुष्यबळ कमी असल्याने कार्यालयीन कामकाजासाठीसुद्धा त्यांना आवश्यक सुटी मिळणे शक्य नाही. अशा स्थितीत कर्मचारी समाधान कक्षाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. समाधान कक्षात प्राप्त तक्रार तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. तक्रार मिळाल्यानंतर तिचे स्वरूप काय, कुठल्या विभागाशी, आस्थापनेशी निगडित आहे, हे पाहून संबंधित लिपिकाकडे ती तक्रार दिली जाते. लिपिकांनी पूरक अभिप्राय दिल्यानंतर ती तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे ठेवण्यात येते. त्या तक्रारीवर अधीक्षकांकडून योग्य कारवाईसाठी निर्देश दिले जातात. यामुळे प्रत्यक्ष तक्रारदाराला स्वत: हजर न राहता आपल्या तक्रारीचे निराकरण करून घेता येते. रजा, वेतन तफावतीसोबतच कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवापुस्तिकेविषयक तक्रारी मांडून त्यात दुरुस्ती करून घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी समाधान कक्ष हा योग्य माध्यम आहे.
४८ तक्रारींचे निवारण
समाधान कक्षात तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेतली जाते. संबंधित लिपिकाच्या माध्यमातून ही माहिती वरिष्ठांकडे पोहोचविण्यात येते.
वर्षभरात ४८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. प्राप्त तक्रारींवर अधिकाऱ्यांकडे कुठली कार्यवाही केली याचा अहवाल संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून तत्काळ दिला जातो.
ना कोणाला रजा, ना कोणाला पदोन्नती
समाधान कक्षामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वाधिक तक्रारी रजा मिळत नसल्याच्या येतात. अत्यावश्यक कारण असूनही वरिष्ठांनी रजा नाकारली. वेतनाची तफावत दूर झालेली नाही. जीपीएफमधून पैसे मिळण्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्याला मंजूरी मिळालेली नाही. त्यासाठी विलंब होतो. अशा स्वरूपाच्या तक्रारी समाधान कक्षात येत असतात.