तोतया पोलिसांनी सव्वा लाखांचे दागिने पळविले; यवतमाळमधील घटना
By सुरेंद्र राऊत | Published: May 12, 2024 06:37 PM2024-05-12T18:37:20+5:302024-05-12T18:37:40+5:30
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तोतयांकडून पोलिस असल्याची बतावणी करीत वयोवृद्धांना व महिलांना फसविले जात आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून तोतयांकडून पोलिस असल्याची बतावणी करीत वयोवृद्धांना व महिलांना फसविले जात आहे. पुढे मोठा गुन्हा घडला, पोलिस तपासणी सुरु आहे, असे सांगत अंगावरील दागिने काढायला लावतात अन् हातचलाखीने रिकामी पुडी देऊन दागिने घेऊन पळतात. असाच प्रकार रविवारी सकाळी शहरातील सत्यसाईज्योत मंगल कार्यालय परिसरात घडला. विनायक केशवराव टोपरे (८४) रा. सरस्वतीनगर वडगाव रोड हे एका मेडिकलमधून दुचाकीने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यात थांबवून दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. पुढे चेकींग सुरू आहे, आम्ही पोलिस आहोत, तुमच्या जवळील सोन्याची अंगठी व चेन आमच्याकडे द्या, त्याची पुडी बांधून खिशात ठेवा, असे सांगितले.
याला टोपरे यांनी नकार दिला. त्यांचा विश्वास पटण्यासाठी मागून आलेल्या एका व्यक्तीला त्या दोघांनी थांबवून त्यांच्याकडील दागिने मागितले. त्या दागिन्यांची पुडी बांधून संबंधिताकडे परत केली. हा प्रकार पाहून टोपरे यांचा विश्वास बसला. त्यांनीसुद्धा बोटातील अंगठी व गळ्यातील गोफ काढून त्या तोतयांकडे दिला. हातचलाखीने तोतयांनी रिकामी पुडी टोपरे यांच्या हातात दिली व तेथून पोबारा केला. पुडी उघडली असता त्यात दागिने दिसले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी टोपरे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तब्बल १९ ग्रॅम सोने चोरट्यांनी लंपास केले. १ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल तोतयांनी नेला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, मात्र ठोस काही हाती लागलेले नाही.