अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी मृतदेह पाठविला शवचिकित्सागृहात
By सुरेंद्र राऊत | Published: February 15, 2024 08:13 PM2024-02-15T20:13:49+5:302024-02-15T20:13:55+5:30
जामनकरनगरातील प्रकार : महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची पोलिसांकडे तक्रार
सुरेंद्र राऊत, यवतमाळ : शहरातील जामनकरनगर येथे एका २८ वर्ष महिलेचा मृत्यू झाला. याची माहिती पतीने नातेवाईक व शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर महिलेच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. गुरुवारी दुपारी २.३० वाजता अंत्ययात्रा निघाली. तितक्यात अवधूतवाडी पोलिस तेथे पोहोचले व त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेवून शवचिकित्सागृहात शवचिकित्सेकरिता पाठविला. या घटनेने अंत्ययात्रेत आलेल्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली.
दीपाली ऊर्फ नंदनी महेश मिश्रा (२८) रा. जामनकरनगर यवतमाळ असे मृत महिलेचे नाव आहे. दीपालीचा गुरुवारी झोपेतच मृत्यू झाला, अशी माहिती तिचा पती महेश जनार्दन मिश्रा (३४) याने शेजारी व नातेवाईकांना दिली. त्यानंतर शेजारी, नातेवाईक यांनी दीपालीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. दरम्यान हा प्रकार संशयास्पद वाटल्याने एका नागरिकाने 'डायल ११२' या क्रमांकावर संपर्क केला व महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याबाबतची शंका व्यक्त केली. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांचे पथक महेश मिश्रा याच्या घरी गुरुवारी दुपारी २.३० वाजता पोहोचले.
पोलिसांना तेथे कोणीच आढळून आले नाही. अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी स्मशानभूमीत जाणारी अंत्ययात्रा रस्त्यातच थांबवून दीपालीचा मृतदेह ताब्यात घेतला. दीपालीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास करण्यासाठी तिचा मृतदेह शवचिकित्सागृहात ठेवला आहे. तूर्त या प्रकरणात अवधूतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून दीपालीचा पती महेश मिश्रा याची पोलिसांकडून चाैकशी केली जात आहे.
दीपालीच्या मृत्यूचे खरे कारण शवचिकित्सा अहवालानंतरच पुढे येईल, असे अवधूतवाडी ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांनी 'लोकमत'ला सांगितले. दीपाली व महेशला पाच वर्ष आठ वर्षाची दोन मुले आहेत. नेमका काय प्रकार घडला याचा शोध घेतला जात आहे. दीपालीच्या मृत्यूबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. शवचिकित्सा अहवालानंतर पोलिस याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.
दीपालीला आईवडील नाही
दीपाली महेश मिश्रा हिला पती, दोन मुलं यांच्या व्यतिरिक्त जवळच नातेवाईक नाही, दीपाली आईवडील, भाऊ, बहीण असे जवळचे नातेवाईक नसल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले आहे, त्यामुळे घातपाताचा संशय आणखी बळावला आहे.