दारुबंदीसाठी पोलीस वाहनाला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:13 PM2018-06-15T22:13:25+5:302018-06-15T22:13:32+5:30
तालुक्यातील भांबोरा येथे दारुबंदी करीता तंटामुक्त समितीने पोलिसांच्या वाहनाला घेराव घातला. गावात पूर्वी दारुबंदी होती. आता मात्र पोलीस आशीर्वादाने दारुचा महापूर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यातील भांबोरा येथे दारुबंदी करीता तंटामुक्त समितीने पोलिसांच्या वाहनाला घेराव घातला. गावात पूर्वी दारुबंदी होती. आता मात्र पोलीस आशीर्वादाने दारुचा महापूर आला आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी घेराव घालून आपला रोष व्यक्त केला.
भांबोरा येथील दारूबंदी करून गावात सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यात आले होते. तंटामुक्त समितीने यासाठी पुढाकार घेतला होता.मात्र मागील काही दिवसांपासून अवैध दारू गाळप करणारे, दारू विक्री करणारे यांना स्थानिक पोलिसांकडून अभय मिळत आहे. दारूच्या अवैध व्यवसायाबाबत महिलांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. याची दखल घेण्यात आली नाही. शुक्रवारी पोलिसांचे वाहन गावात आले असता महिला व युवकांनी गाडीला घेराव टाकून जाब विचारला. यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली.