१८ हजार ४३६ बालकांना पाजणार पोलिओ
By admin | Published: April 2, 2017 12:33 AM2017-04-02T00:33:19+5:302017-04-02T00:33:19+5:30
पोलिओ रोगाचे उच्चाटनासाठी तालुक्यात येत्या २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे.
वणी तालुका : वणी शहरात २७ व ग्रामीण भागात १५९ लसीकरण बुथची व्यवस्था
वणी : पोलिओ रोगाचे उच्चाटनासाठी तालुक्यात येत्या २ एप्रिल रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी व यशस्वितेसाठी तहसीलदार रवींद्र जोगी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी तालुकास्तरीय दक्षता समितीची सभा घेण्यात आली.
या मोहिमेसाठी तालुक्यातील राजूर (कॉलरी), शिरपूर, कायर आणि कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रूग्णालय वणीच्या माध्यमातून पाच वर्षापर्यंतच्या वणी शहरातील सुमारे सात हजार ७७२ व ग्रामीण भागातील १० हजार ६६४ बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. विशेष दक्षता म्हणून तालुक्यातील कोळसा खाणीच्या परिसरातील कोलडेपो आणि वस्त्या, चुनाभट्टी, कापसाचे जीन, गीट्टी क्रेशर, विटभट्टे, बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगाराची व स्थलांतरीत समुदयाच्या बालकांना पोलिओ लस देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. तालुका आरोग्य विभागाकडून तालुक्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेकरिता शहरात २७ व ग्रामीण भागात १५९ लसीकरण बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपपकेंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, नगरपरिषदेच्या शाळा, बालवाडी आदी ठिकाणी आणि प्रवासात असणाऱ्या बालकांसाठी बसस्थानक, रेल्वे स्थानक, टोल नाके येथे पोलिओ लस पाजण्याची व्यवस्था केली आहे. त्याकरिता सहा ट्रान्झिट टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच परप्रांतीय तथा स्थलांतरीत समुदायाच्या बालकांना लस देण्याकरिता सात मोबाईल टीम तयार करण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी आपल्या बालकांना पोलिओ लस पाजून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी एन.टी.खेरे, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक इंगोले, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनिता बेरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास कांबळे यांनी केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)