‘वसंत’ला वाचविण्यासाठी राजकीय नेत्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:21 PM2018-02-09T22:21:32+5:302018-02-09T22:22:27+5:30
तालुक्याची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना देशोधडीला लागल्यानंतर सत्ताधारी भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँक अध्यक्षांनी एकत्र बैठक घेऊन कारखाना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : तालुक्याची कामधेनू वसंत सहकारी साखर कारखाना देशोधडीला लागल्यानंतर सत्ताधारी भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँक अध्यक्षांनी एकत्र बैठक घेऊन कारखाना वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. जिल्हा बँकेने ताबा घेतल्यानंतर आता शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे शुक्रवारी उमरखेड येथे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.
येथील विश्रामगृहावर आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांची तासभर बैठक झाली. यात जिल्हा बँक व वसंत कारखाना प्रशासन यांंना सोबत घेऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी वसंत साखर कारखान्यावर जिल्हा बँकेने जप्ती आणली. कारखान्याची स्थावर मालमत्ता ताब्यात घेतली. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. गत वर्षभरापासून कारखाना बंद असून यामुळे ऊस उत्पादक आणि कामगार उद्ध्वस्त होत आहे. त्यातच जिल्हा बँकेने ताबा घेतल्याने वसंत सुरू होण्याची आशा मावळली आहे. याचा मोठा फटका उमरखेड तालुक्याला बसणार आहे. त्यामुळे वसंत साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेत शुक्रवारी बैठक घेण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत बैठक घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजेंद्र नजरधने यांनी सांगितले. या बैठकीला उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने, माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, विलास चव्हाण, भीमराव चंद्रवंशी, अॅड. संतोष जैन, नितीन भुतडा, बळवंतराव नाईक, बालाजी वानखडे, सुभाष दिवेकर, कामगार नेते पी.के. मुडे, व्ही.एम. पतंगराव आदी उपस्थित होते.