कापूस खरेदीसाठी राजकीय दबाव; पणन अध्यक्षांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:14 AM2020-06-04T11:14:31+5:302020-06-04T11:14:55+5:30
मान्सूनपूर्व पावसामुळे आज कापूस खरेदीची परिस्थिती नाही. तरीही खरेदीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे. यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे, असा सनसनाटी आरोप कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी केला.
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मान्सूनपूर्व पावसामुळे आज कापूस खरेदीची परिस्थिती नाही. तरीही खरेदीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे. यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे, असा सनसनाटी आरोप कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी केला. कापूस खरेदीच्या आजच्या परिस्थितीवर ते प्रस्तुत प्र्रतिनिधीशी बोलत होते.
दबावातून खरेदी झालेला कापूस आता उघड्यावर आहे. राज्यात पावसामुळे साडेतीन लाख क्विंटल कापूस ओला झाला. सध्या कापूस खरेदी केंद्रांवर जागा शिल्लक नाही. या स्थितीत कापूस खरेदी कसा करणार, असा सवाल त्यांनी केला, असे सांगून नुकसान टाळण्यासाठी तूर्त कापूस खरेदी बंद केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पणन महासंघ राज्यातील १२७ केंद्रांवर कापूस खरेदी करीत आहे. सीसीआय जोपर्यंत कापूस खरेदी करणार, तोपर्यंत पणन महासंघही कापूस खरेदी करणार आहे. परिस्थिती तयार झाल्यावर खरेदीला सुरुवात होईल, असे ते म्हणाले.
राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक वाहनांचे मोजमाप करण्यासाठी आदेश काढले आहे. यातून कापूस संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात कापूस आला. आता हा कापूस ठेवण्यासाठी जागा राहिली नाही. कापूस, सरकी, गाठी उघड्यावर आहे. हजारो क्विंटल कापसाचे जिनिंग बाकी आहे. उघड्यावर पडलेला कापूस रविवारी मान्सून पूर्व पावसाने ओला झाला. आता हा कापूस वाळविण्यासाठी जागा शिल्लक नाही. कापूस ओलाच राहिला, तर काळा पडून खराब होण्याचा धोका आहे. यामुळे पणन महासंघ नुकसानीची जबाबदारी घेणार नसल्याचे अध्यक्ष देशमुख यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासन परस्पर आदेश काढून मोकळे होत आहे. जेथे साठवण क्षमता आहे, जिनिंगची व्यवस्था आहे, अशा ठिकाणी कापूस खरेदी पुढील काळात होणार आहे. शेतकऱ्यांचा कापूस सुरक्षित राहावा आणि शासनाचेही नुकसान होऊ नये, या पद्धतीने खरेदी आवश्यक आहे. असे ते म्हणाले.